भायखळा कारागृहात कैद्यांना गरमागरम, स्वादिष्ट जेवण; व्हिल, ई-कुकर, कोल्ड स्टोरेज रूम, गॅस सिलिंडर रूमसह आधुनिक स्वयंपाकगृह

पारंपरिक पद्धतीने जेवण बनविण्याच्या प्रक्रियेला छेद देत भायखळा मध्यवर्ती कारागृहात आधुनिकतेची कास धरण्यात आली आहे. कमी अंगमेहनत, अधिक स्वच्छता व झटपट आणि गरमागरम जेवण कैद्यांना देण्याकरिता कारागृहात अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असे स्वयंपाकगृह उभारण्यात आले आहे. शिवाय उच्च प्रतिचे कोल्ड स्टोअरेजदेखील बांधण्यात आले आहे.

कारागृहांमध्ये पारंपरिक पद्धतीने मोठमोठय़ा हंडय़ांमध्ये जेवण बनविले जाते. मग ते वेगळ्या भांडय़ामध्ये काढून घेऊन ते कैद्यांना दिले जाते. यात अंगमेहनत अधिक तसेच वेळखाऊपणा व म्हणावी तितकी स्वच्छता ठेवणे शक्य होत नव्हते. त्यामुळे याची गंभीर दखल घेत भायखळा जिल्हा कारागृहातदेखील आधुनिकतेला प्राधान्य देण्यात आले आहे. ई जमाना असल्याने कारागृहात व्हिल, ई-कुकर, कोल्ड स्टोरेज रूम, गॅस सिलेंडर रूम यांनी युक्त असे नवीन स्वयंपाकगृह बांधण्यात आले आहे. त्यात कोल्ड स्टोरेज रूमचाही समावेश आहे. अपर पोलीस महासंचालक सुहास वारके यांच्या हस्ते या सुसज्ज स्वयंपाकगृह व नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई, रजनलवार, संदीप चव्हाण, संतोषी कोळेकर, अमृता दशवंत आदी उपस्थित होते.

तृतीयपंथी व आजारी कैद्यांसाठी सहा वेगळे सेल

कारागृहाच्या आवारातच तृतीयपंथी व आजारी कैद्यांसाठी सहा विभक्त सेल बांधण्यात आले आहेत. याचेही उद्घाटन करण्यात आले. हे महिला कारागृहदेखील असल्याने तेथे कैदी महिलांसह त्यांची सहा वर्षांखालील मुलेदेखील असतात. त्यामुळे कैद्यांसह लहान मुलांना अधिक स्वच्छ व गरमागरम जेवण मिळणार आहे.

आधुनिक व सुसज्ज स्वयंपाकगृहामुळे कैद्यांना जेवण बनवणे अधिक सुलभ होणार असून उच्च प्रतीची स्वच्छता ठेवणे शक्य होणार असल्याचे यांनी सांगितले. – विकास रजनलवार, अधीक्षक (भायखळा जिल्हा कारागृह)

Comments are closed.