अभिप्राय – नाट्यछटांचा नवा आविष्कार

>> प्रो. डॉ. बाळासाहेब लबडे

प्रसिद्ध साहित्यिक डॉ.श्रीकांत पाटील यांचे ‘रंगतदार नाटय़छटा’ हे नाटय़छटेचे पुस्तक वैशिष्टय़पूर्ण आहे. छोटय़ा मुलांसाठी हे चांगले पुस्तक आहे आणि मुखपृष्ठावर आपल्याला जे वेगळेपण मुलांच्या चित्रातून सूचक व्यक्त होते आहे ते आकर्षक आहे. या पुस्तकासाठी जो मलपृष्ठ आहे तो मराठी नाटय़ सिने अभिनेते व अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद मुंबईचे अध्यक्ष माननीय प्रशांत दामले यांचा आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रातील असणाऱया एका दिग्गज अभिनेत्याने दिलेला हा अभिप्राय आहे. त्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे.

‘रंगतदार नाटय़छटा’ या पुस्तकामध्ये त्यांनी विशेषतबाल, कुमारवयीन, किशोरवयीन मुलांना डोळ्यासमोर ठेवूनच याचे लेखन केलेले आहे. त्यामुळे निरागस वयातील असणाऱया मुलांना नाटय़कलेची आवड यामुळे निर्माण होईल यात काही शंका नाही. या पुस्तकांमध्ये एकूण 23 नाटय़छटा आहेत. त्या नाटय़छटा वेगवेगळ्या विषयांवरील आहेत. जगण्याचे  नाटय़ आविष्कृत करणारी कला असं तिचं वर्णन करता येईल.

यातील ‘बाहेर नको जाऊस?’ ही पहिली नाटय़छटा ही आत्मनिवेदनपर आहे. या आत्मनिवेदनात बालमानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून लहान मुलांच्या मनामध्ये मोठय़ांनी दाखवलेली भीती आणि त्यांच्या मनातील असणारी उत्सुकता अशा दोन्हींचा सुरेख संगम त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे. मुलांच्या मनामध्ये असणारी खेळण्याची इच्छा ही कायमस्वरूपी जागी असते आणि त्यामुळे अभ्यासाचा तोच तोच रटाळपणा त्यांना नको असतो. या दोन्हीतील असणारा विरोधाभास चपखलपणे या नाटय़छटेत त्यांनी व्यक्त केला आहे.

‘काय म्हणावं या पावसाला?’ ही नाटय़छटा ज्यात खास कोल्हापुरी बोलीचा उपयोग केलेला आहे. ग्रामीण बोली भाषेतील शब्दकळेमध्ये ही नाटय़छटा असल्यामुळे तिचे वेगळेपण सहजच आपल्या लक्षात येते. पावसाला कंटाळलेली मुले असा या नाटय़छटेचा विषय आहे. त्यामुळे गावाला पूर आला की पाऊस नको नकोसा होतो. या पावसाला काय म्हणावं? हा प्रश्न सारखा सारखा नाटय़छटाकाराने यात विचारलेला आहे. लोकगीतातून दिसणारा पाऊस वेगळा आणि प्रत्यक्षात असणारा पाऊस वेगळा असा यातील fिवरोधाभास या नाटय़छटेतून आला आहे. ‘खेळू दे ना मला’ या नाटय़छटेतून मुलांच्या जीवनात अभ्यासाचे महत्त्व तर आहेच पण तितकेच खेळाचे महत्त्व सांगत विचार मांडले आहेत. ‘प्रभात फेरी’ या नाटय़छटेत साक्षरता अभियानाची प्रभात फेरी निघालेली आहे. यात मुलं कोणकोणती भूमिका आहेत. त्याच्याविषयीचे चित्र ही नाटय़छटा रंगवत जाते.

श्रीकांत पाटील यांच्या नाटय़छटेचे वैशिष्टय़ असं की त्या बालसुलभ असल्या तरी प्रबोधन करत आहेत. त्यांच्यात नाटय़ात्मक आत्मनिवेदनाचा एक चांगला सूर आहे. त्यामुळे या नाटय़छटा प्रभावी होत आहेत.

‘काय ही आजची पोरं?’ ही नाटय़छटा मुलांच्या ठिकाणी असलेल्या दुर्गुणांना उजागर करून त्यांच्या ठिकाणी सद्गुण कसे निर्माण होतील याविषयी प्रबोधन मांडणारी आहे. त्यामुळे मुलांनी नक्की काय करायला पाहिजे याविषयीचे मार्गदर्शन यात दिसते. रोज रोज भीती कशाला घालतेस? या नाटय़छटेत नवरा आणि बायको यांच्यातील संवादाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबातील असलेली जी विसंगती आहे ती मांडलेली आहे. बायकांचा स्वभाव आणि पुरुषांचा स्वभाव या दोन्हीतील विसंगती ही नाटय़छटा दाखवते.

‘शांत रहा जरा’ या नाटय़छटेतून शाळेतील गुरुजी विद्यार्थ्यांमधील असणारी भांडणे कशी सोडवतात यावर आधारित आहे. त्यातून शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध यावर ही नाटय़छटा भाष्य करते. त्यामुळे ही नाटय़छटा शैक्षणिक जीवनात हसत खेळत शिक्षण असा संदेश देणारी आहे. ‘का चिडवताय?’ ही नाटय़छटा बोबडय़ा मुलाची गोष्ट सांगणारी आहे. त्या बोबडय़ा बोलीभाषेमध्येच ती व्यक्त झालेली असल्यामुळे अतिशय प्रभावी ठरली आहे.

‘किती व भोळे तुम्ही’ ही नाटय़छटा एक न नाटय़ आहे. ज्यात लेखक वेगळ्या प्रकारे व्यक्त झाला आहे. यात लेखक स्वतचे आत्मनिवेदन अतिशय प्रभावीपणे मांडतात. ‘येरे येरे पावसा’ यातून पावसाची अनेक रूपं नाटय़छटाकाराने दाखवली आहेत. या आणि अशा एकापेक्षा एक अशा नाटय़छटा या पुस्तकात आहेत. श्रीकांत पाटील यांनी रंगतदार नाटय़छटा या पुस्तकामध्ये नाटकाचे एक सूक्ष्मरूप सक्षमपणे, संवादात्मक, प्रायोगिक अशा अनेक पातळ्यांवर रेखाटलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय आहे.

रंगतदार नाटय़छटा

लेखक ः श्रीकांत पाटील

प्रकाशक ः संस्कृती प्रकाशन, पुणे

पृष्ठे ः 64, किंमत ः 200 रुपये

Comments are closed.