बिहारमध्ये महिलांच्या खात्यात मोदींनी प्रत्येकी 10 हजार टाकलेत, मग माझ्या महाराष्ट्राच्या बहिणी कमी लाडक्या आहेत का? उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

बिहारच्या निवडणुका अजून जाहीर झाल्या नाहीत तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील 75 लाख महिलांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपये टाकले आहेत. तुम्हाला बिहारच्या महिला जास्त लाडक्या आहेत आणि महाराष्ट्रातील माझ्या बहिणी कमी लाडक्या आहेत का? की, बिहारच्या महिलांची तुम्हाला मतासाठी गरज आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावर जास्त प्रेम करत आहात का, असा जोरदार हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. फक्त निवडणुकांच्या वेळीच कशाला, तर देशातील प्रत्येक महिलेला दर महिन्याला दहा हजार रुपये द्या, अशी मागणी करत तुम्ही महिलांना पैसे देता म्हणजे उपकार करत नाही. ते त्यांच्या हक्काचे आहेत, असेही त्यांनी ठणकावले.

पुण्याच्या अजित नागरी पतसंस्था महिला बचत गटातील एक हजार कर्जदार महिलांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभांगी रांजणे, चांदबेबी शेख, सुशीला चांभारे, रहिमा शेख, पारूबाई चव्हाण या महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक, आमदार मिलिंद नार्वेकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, राज्य संघटक वसंत मोरे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यावेळी उपस्थित होते.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार?

लाडक्या बहिणींनाही तुम्ही एकवीसशे रुपये देणार होते, ते कधी देणार आहात? पंधराशे रुपये देतानाच तुमचे वांदे होत आहेत. तुम्ही महिलांना दीड हजार देत असला तरी त्या तुमच्या पगारी मतदार नाहीत. त्या माझ्या बहिणी आहेत. त्यांना त्यांचे मतस्वातंत्र्य आहे, असे खडे बोलही त्यांनी सुनावले. सध्या महाराष्ट्रात भीषण परिस्थिती असून शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

जसे निवडणुकीच्या आधी दोन-तीन महिन्यांचे हप्ते बँकेत जमा केलेत तसेच पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते द्या, महाराष्ट्राच्या महिलांना आता त्याची गरज आहे!

गडगंज उद्योगपती संपत्ती लुटून परदेशात पळाले

सगळे गडगंज उद्योगपती संपत्ती लुटून परदेशात पळाले. नंतर या उद्योगपतींचे कोटय़वधी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आली. मात्र शेतकऱयांना कर्जमाफी दिली जात नाही. सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ मदतीची गरज आहे. सत्ता असो किंवा नसो, शिवसेना तुमच्या मदतीसाठी आहे, अशी ग्वाही देतानाच शिवसैनिकांनो, लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे रहा, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.

Comments are closed.