रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं? अॅड. अनिल परब यांचा खळबळजनक सवाल

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाहक बदनामी करण्यासाठीच गद्दार रामदास कदम खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्ये करीत आहेत. त्यांनी आमच्या नार्को टेस्टचीही मागणी केली आहे. मात्र आमच्यासोबत त्यांचीही नार्को टेस्ट करा. कारण रामदास कदम यांची बायको ज्योती कदम यांनी 1993 मध्ये स्वतःला जाळून घेतले की तिला जाळले, हे स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पुतण्याने आत्महत्या का केली, हेदेखील आजपर्यंत समोर आले नसल्याचा खळबळजनक सवाल शिवसेना आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी आज केला. गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांनी आपल्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी, असे आव्हानच परब यांनी दिले.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित शिंदे गटाच्या कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. कदमांच्या या वक्तव्याचा अॅड. अनिल परब यांनी वांद्रे येथे पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल केलेला दावा 100 टक्के खोटा असल्याचे ते म्हणाले. कदम यांचे आरोप म्हणजे नीचपणा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खेडमध्ये रामदास कदम यांचे काय उद्योग सुरू आहेत, दारू पिऊन कोण धिंगाणा घालतो, त्यांनी कुणाकुणाला बंगले बांधून दिले, वाळूचोरी, जमीन बळकावणे, हडप करणे असे धंदे कोण करीत आहे हे योग्य वेळी जाहीर करू, असा इशाराच परब यांनी दिला. योगेश कदम गृह राज्यमंत्री आहेत. त्यांनी या प्रकरणांची चौकशी करावी, असे आव्हानच परब यांनी दिले. सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांबाबत अपयश आल्याने लोकांचे लक्ष इतर ठिकाणी वळवण्यासाठीच हे प्रकार सुरू असल्याचेही परब म्हणाले.

कदमांची अक्कल गुडघ्यात!

बाळासाहेबांची प्रकृती नाजूक असताना अनेक जण त्यांना भेटण्यासाठी गर्दी करीत होते. या वेळी तज्ञ डॉक्टरांची टीम बाळासाहेबांच्या सोबत 24 तास होती. यातच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे निदान डॉक्टरांनी केल्यानंतरच ही बाब डॉक्टारांनीच शिवसेनेच्या काही नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर केली. असे असताना बाळासाहेबांचे पार्थिव दोन दिवस ठेवल्याचे सांगणाऱया कदमांची अक्कल गुडघ्यात आहे, असे सांगतानाच 2012 मध्ये ‘मातोश्री’वर ते कुठल्या बाकडय़ावर झोपले होते, असा टोला लगावत पार्थिव दोन दिवस शवपेटीशिवाय ठेवता येते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या शिशुपालाचे आता 100 अपराध भरले आहेत. त्यामुळे पुढील अधिवेशनात पुराव्यांसह कदमांचे धंदे उघड करणार असल्याचेही परब यांनी सांगितले.

ठसे आणि मोल्डमधील फरक कळतो का?

बाळासाहेब असतानाच त्यांच्या हाताचे मोल्ड बनवण्यात आले होते. हे मोल्ड आधी सहारा स्टेडियममध्ये, तर त्यानंतर वर्षा निवासस्थानीही ठेवण्यात आले होते. या मोल्ड आणि ठसे यांच्यातला फरक कदमांना कळतो का? आणि निधन झालेल्या व्यक्तीचे ठसे चालत नाहीत. शिक्षण कमी असलेल्या कदमांना या गोष्टी कळत नसल्याचा टोलाही परब यांनी लगावला. खुद्द बाळासाहेबांनी आपल्या हाताचे मोल्ड पाहिले होते.

अब्रुनुकसानीचा दावा ठोकून रक्कम पूरग्रस्तांना देणार

रामदास कदम यांचे आरोप धादांत खोटे आहेत. उद्धव ठाकरे यांना मिळणाऱया वाढत्या पाठिंब्यामुळे त्यांच्या बदनामीसाठीच असे आरोप केले जात आहेत. त्यामुळे कदमांच्या खोटय़ा वक्तव्यांबाबत मी त्यांना कोर्टात खेचणार आहे. त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असून कोर्टाच्या निर्देशानुसार मिळणारी रक्कम पूरग्रस्तांना देणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

डागाळलेल्या मंत्र्याला फडणवीस किती वेळा पाठीशी घालणार?

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या आईच्या नावे चालवलेल्या बारमध्ये पोलिसांच्या धाडी पडतात. तरीही पोलीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहराज्यमंत्र्यांवर कोणतीही कारवाई करीत नाहीत. मुख्यमंत्री अशा डागाळलेल्या मंत्र्याला किती दिवस पाठीशी घालणार, असा सवालही त्यांनी केला. नैतिकतेच्या मुद्दय़ावर योगेश कदम यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही परब यांनी केली.

Comments are closed.