अवतीभवती – नाण्यांची श्रीमंती

>> दुर्गेश आखाडे

छंद हा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणत असतो. लहानपणी असलेले छंद किशोरवयीन वयात मागे पडतात, पण शालेय जीवनापासून लागलेला छंद अनेकजण संपूर्ण आयुष्यभर जोपासतात. पैसे कमविण्यासाठी मेहनत करणारे आपण नेहमी पाहतो. इथे पैसे जमविण्यासाठी एक तरुण धडपड करत आहे. आजच्या आधुनिक काळात लांजा तालुक्यातील एका तरुणाला विविध देशांची नाणी साठवण्याचा छंद जडला आहे. त्याने आजतागायत 125 देशांतील सुमारे पाच हजार नाण्यांचा संग्रह केला आहे. चिन्मय बेर्डे असे या तरुणाचे नाव आहे.

सहावी इयत्तेत शिकत असताना चिन्मयला नाण्यांचा संग्रह करण्याचा छंद जडला. सुरुवातीला हिंदुस्थानातील चलनी नाणी तो साठवू लागला. काही पुरातन नाणी त्याला सापडली. त्यानंतर त्याने नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून परदेशातील नाणी गोळा करायला सुरुवात केली. काही परदेशी नाणी त्याने विकतही घेतली आहेत. हिंदुस्थानसह अमेरिका, चीन, जपान, मलेशिया न्यूझीलंड, थायलंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, चिली, पेरूसह युरोप खंडातील देशांची नाणी त्याने संग्रहित केली आहेत. त्याने संग्रहित केलेल्या नाण्यांचे पहिले प्रदर्शन रत्नागिरीतील ओ. पी. जिंदाल वसतिगृहात भरले होते.त्यानंतर नगरवाचनालयात चिन्मयने प्रदर्शन मांडले. सर्वात मोठी संधी मिळाली ती आर्ट सर्कलच्या कला महोत्सवात. या महोत्सवात चिन्मयने मांडलेले नाण्याचे प्रदर्शन अनेकांनी पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक शिवराई हे नाणे त्याने संग्रहित केले आहे. चिन्मयने विविध देशांतील तीनशे नोटाही संग्रहित केल्या आहेत. संग्रहित केलेली नाणी जतन करण्यासाठी चिन्मय सापाची ताजी कात किंवा वेखंडाच्या लहान पुरचुंडय़ा करून नाणी त्यात ठेवतो.

नाणी ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारची डबी किंवा फोल्डर वापरतो. आज चिन्मयकडे विविध देशांच्या पाच हजार नाण्यांची श्रीमंती आहे. चिन्मयला नाणी संग्रहाचा छंद जोपासताना त्यावर अभ्यास करून पदवी प्राप्त करायची आहे. चिन्मय बेर्डे हा ‘गोष्ट नाण्यांची’ या विषयावर व्याख्यान देतो.

Comments are closed.