रोखठोक – भारतीय संस्कृतीचा खेळखंडोबा, सगळेच उघडे पडले!

देशावर बेगडी प्रेम करणाऱ्यांची राजवट सध्या सुरू आहे. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची अवस्था सगळ्यात केविलवाणी झाली आहे. ‘तो मी नव्हेच’सारखे खुलासे करीत ते फिरत आहेत. राहुल गांधींवर गोळ्या चालवण्याची भाषा उघडपणे केली जाते. सोनम वांगचुकसारख्या देशभक्तांना देशद्रोही ठरवून संस्कृती, संविधानाचा खेळखंडोबा केला जात आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील एक भयानक खेळखंडोबा कधी संपेल? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. आपल्या देशाविषयी मनापासून प्रेम नसलेल्या लोकांचे राज्य आज दिल्लीवर आहे. हे राज्य ब्रिटिशांप्रमाणे अमरपट्टा बांधून आलेले नाही. त्यामुळे लोकांनी आशावादी राहायला हरकत नाही. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडून जनतेला अपेक्षा होत्या, पण चंद्रचूड हे न्यायासनावर बसलेले भारतीय संविधानाचे गारदी निघाले. सुप्रीम कोर्टात बसून ते पंतप्रधान मोदी व संघाचा अजेंडा राबवीत होते. मोदी यांना राजकीयदृष्ट्या मदत होईल असे निकाल त्यांनी दिले. हे सर्व आता ‘एक्सपोज’ झाले आहे व ‘मी तसा वागलो नाही,’ असे खुलासे करणाऱ्या मुलाखती देत ते देशभर फिरत आहेत. चंद्रचूड हे निवृत्त झाले. नोव्हेंबर महिन्यात सरन्यायाधीश भूषण गवई निवृत्त होतील, पण संविधानाशी संबंधित अनेक खटले अनिर्णीत अवस्थेत पडले आहेत. शिवसेना, शिवसेनेचे चिन्ह, शिंदे गटाचे बेकायदा पक्षांतर व बेकायदा स्थापन केलेले सरकार याबाबत आतापर्यंत तीन सरन्यायाधीश निवृत्त झाले. निकाल कोणीच दिला नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीने भ्रष्टाचाराचा अमर्याद विजय होत आहे. देशातील सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट काय कामाची?

जनतेचा अधिकार

न्यायालये निष्पक्ष राहिलेली नाहीत हे अलीकडे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यापासून सगळ्यांनी दाखवून दिले. त्यामुळे राज्यकर्त्यांची मनमानी वाढली आहे. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अर्णब गोस्वामी या पत्रकाराला जामीन मिळवून देण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे रात्री उघडले व खुनाचा आरोप असलेल्या गोस्वामीला व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या नावाखाली जामीन दिला. अपवादात्मक परिस्थितीत असे निर्णय होतात असे त्यावर चंद्रचूड सांगतात. दिल्लीतील विद्यार्थी नेता शर्जील इमाम पाच वर्षांपासून तुरुंगात आहे. दिल्लीतील दंग्यात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पाच वर्षांत त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होत नाही. सुनावणीची वेळ येते तेव्हा माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे प्रकरण न्या. बेला त्रिवेदी यांच्याकडे ठरवून सोपवले. बेला त्रिवेदी या गुजरातच्या लॉ सेक्रेटरी होत्या. मोदींमुळे त्या न्यायाधीश झाल्या. त्यामुळे सरकारविरोधी कोणतीच भूमिका त्या घेत नाहीत. बेला त्रिवेदींसमोर शर्जीलचे प्रकरण आणून त्याचा जामीन नाकारण्याची पूर्ण व्यवस्था माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली. आज सोनम वांगचुक यांना राष्ट्रद्रोही ठरवून मोदी सरकारने तुरुंगात टाकले. संविधानानुसार राज्यकर्ते काम करीत नाहीत. निदान उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात तरी ते व्हावे या अपेक्षेवरही आता पाणी पडले आहे. श्री. उद्धव ठाकरे मराठवाड्यातील पूरपरिस्थिती पाहण्यासाठी तेथे गेले. पी. एम. केअर फंडाचा विषय त्यांनी काढला. हा पैसा कोठून आला व जातोय कोठे, हे समजून घेण्याचा अधिकार भारतीय जनतेला नसेल तर कोणाला आहे? सोनम वांगचुक यांच्या स्वयंसेवी संस्थांना परदेशी पैसा मिळतो व त्यांच्या हिशेबात घोटाळे आहेत या सबबीखाली वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली, पण पी. एम. केअर फंडातील पैशांचा व्यवहार काय झाला हे देशापुढे मांडायला सरकार तयार नाही, याचा काय अर्थ समजायचा? विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच कोटी महिलांना ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करून महिन्याला 1500 रुपये देणे सुरू केले. आता बिहार विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 75 लाख महिलांच्या खात्यांवर प्रत्येकी दहा हजार रुपये जमा केले. म्हणजे बिहारात मतांचा भाव दहा हजार रुपये हा मोदी यांनी ठरवून टाकला. मते विकत घेण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे, असे आमच्या निवडणूक आयोगाला वाटत नाही व सर्वोच्च न्यायालयही अशा विषयांवर कुंपणावर बसून राहते. आपले वागणे चुकीचे आहे असे ज्यांना आजपर्यंत पटलेले नाही असे पंतप्रधान मोदी यांच्या रूपाने बसले आहेत. मोदी यांच्यानंतर पुन्हा असा पंतप्रधान होणार नाही. पंतप्रधान मोदी यांच्याभोवती आज खुशमस्करे जास्त आहेत. त्यात आपले गृहमंत्री अमित शहा सगळ्यात पुढे. मोदी हे किती काम करतात हे सांगताना त्यांचे खुशमस्करे किती टोक गाठतात? श्री. अमित शहा एका मुलाखतीत अभिमानाने सांगतात, “शायद ही कोई प्रधानमंत्री होगा जो पार्टी के बैठक में, डायस मे से उठकर फ्रेश होने को भी नहीं जाता. तीन दिन की कार्यकारिणी चल रही है तो तीन दिन पुरा वो सजग अवस्था मे मंच पर पुरी कार्यवाही करते हुवे बैठे मिलेंगे.” याचा अर्थ काय तर मोदी तीन दिवस बसून असतात व बाथरूमला जात नाहीत. बोलणारे बोलून जातात, पण ज्यांच्या विषयी हे बोलले जाते त्या पंतप्रधानांना या अशा बोलण्याचा त्रास कसा होत नाही? पण हे असे अफाट कष्ट करणारे, कष्ट करताना ‘फ्रेश’देखील न होणारे पंतप्रधान मराठवाडय़ातील पूरग्रस्तांना आधार द्यायलाही पोहोचले नाहीत.

गांधी हत्येची धमकी!

पंतप्रधान मोदी हे वारंवार लोकांसमोर येऊन रडण्याचे नाटक करतात. कधी आपल्याला, तर कधी आपल्या आईला शिव्या दिल्याचा कांगावा ते करत असतात. कोणत्याही निवडणुका आल्या की, त्यांना रडण्याची उबळ येते, पण देशातील इतर नेत्यांच्या बाबतीत भाजपच्या लोकांकडून त्याच भयंकर शब्दांचा वापर केला जातो तेव्हा मोदी गप्प बसतात. केरळातील भाजपचे एक तरुण नेते टीव्हीवरील चर्चेत भाग घेताना जाहीरपणे जे म्हणाले ते देशाच्या संस्कृतीला आणि लोकशाहीला हादरा देणारे आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छातीवर गोळ्या चालवण्याची भाषा भाजपच्या पिंटू महादेवन यांनी केली. देशाच्या विरोधी पक्षनेत्यावर, काँग्रेसच्या माजी अध्यक्षांवर भाजप पदाधिकाऱ्याकडून छातीवर गोळ्या मारून हत्या करण्याची उघड भाषा होते व पंतप्रधान, गृहमंत्री त्याचा साधा निषेध करत नाहीत. राजकीय संस्कृतीचे हे संपूर्ण अधःपतन आहे. भाजपच्या मनात नेमके काय चालले आहे हे या अशा वक्तव्यावरून स्पष्ट दिसते. देशातील सर्व परंपरा, संस्कार मोडीत निघाले आहेत.

तरीही देश चालला आहे. तो आणखी किती काळ चालणार?

ट्विटर – @Rautsanjay61

जीमेल- [email protected]

Comments are closed.