यापुढे कोणतीही चर्चा नाही, आपण आपली शस्त्रे खाली ठेवली पाहिजेत!
गृहमंत्री अमित शाह यांचा नक्षलवाद्यांना अंतिम इशारा
वृत्तसंस्था/ बस्तर (छत्तीसगड)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी छत्तीसगडला भेट दिली. बस्तरमध्ये अमित शाह यांनी माँ दंतेश्वरी तीर्थस्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी बस्तर जिह्याचे मुख्यालय असलेल्या जगदलपूर येथील बस्तर दसरा लोक महोत्सव आणि स्वदेशी मेळाव्याला संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी नक्षलवाद्यांना अंतिम इशारा दिला. नक्षलवादी संघटनांशी चर्चा करण्याची वेळ संपलेली आहे. त्यामुळे आता त्यांना आपली शस्त्रs खाली ठेवावीच लागतील, असे कार्यक्रमाला संबोधित करताना अमित शाह यांनी स्पष्ट केले. तसेच नक्षलवाद्यांच्या धोक्याचा अंत करण्यासाठी 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
जगदलपूर येथील मेळाव्यामध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांसंबंधीची सरकारची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. आता नक्षलवाद्यांशी चर्चेची शक्यता नाही. सरकारच्या फायदेशीर आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणाचा स्वीकार केल्यानंतर त्यांना (नक्षलवाद्यांना) आपले शस्त्र खाली ठेवावे लागेल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. काही लोकांनी नक्षलवाद्यांशी चर्चेचे आवाहन केले आहे. मात्र, मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की छत्तीसगड आणि केंद्र सरकार दोन्ही बस्तर आणि सर्व नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी वचनबद्ध आहेत. आता बोलण्यात काय अर्थ आहे? गेल्या कित्येक दिवसांपासून सरकारच्या वतीने एक आकर्षक आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरण लागू केले गेले आहे. या धोरणांतर्गत ‘पुढे या आणि शस्त्रs खाली ठेवा’ असा शेवटचा इशारा शाह यांनी दिला आहे.
शांतता बिघडवणाऱ्यांना योग्य उत्तर मिळेल
शस्त्रांच्या बळावर बस्तरची शांतता बिघडवणाऱ्यांना सुरक्षा दलाचे जवान योग्य उत्तर देतील, असा इशारा अमित शाह यांनी दिला. दिल्लीतील काही लोक गेल्या काही वर्षांपासून चुकीची माहिती पसरवत आहेत. नक्षलवादाचा जन्म विकासासाठी लढण्यासाठी झाल्याचा दावा केला जात आहे. परंतु मी माझ्या आदिवासी बांधवांना सांगण्यासाठी आलो आहे की संपूर्ण बस्तर विकासापासून वंचित आहे. याचे मूळ नक्षलवाद आहे. त्यामुळे नक्षलवाद सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी सोडू नका, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
छत्तीसगडच्या विकासासाठी सरकार वचनबद्ध
बस्तरमधील कार्यक्रमाला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने 10 वर्षांत विकासकामांसाठी छत्तीसगडला 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी दिला आहे. पंतप्रधानांच्या वतीने मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की 31 मार्च 2026 नंतर नक्षलवादी तुमचा विकास थांबवू शकणार नाहीत. ते तुमचे हक्क रोखू शकणार नाहीत. केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थितांना नक्षलवादाने दिशाभूल केलेल्यांना हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी राजी करण्याचे आवाहन केले.
Comments are closed.