पाऊलखुणा – श्रीरामांच्या मूळ मूर्ती : कालेराम मंदिर

>> आशुतोष बापट , [email protected]
अयोध्येच्या मध्यभागात असलेल्या स्वर्गद्वार इथे असलेले रामाच्या मूळ मूर्ती असलेले हे मंदिर अयोध्या भेटीत अवश्य बघायला हवे.
इ.स.च्या 12 व्या शतकात अयोध्येमध्ये बांधलेले रामलल्लाचे मंदिर पाडण्यासाठी सन 1528 मध्ये बाबर आला. त्याने राममंदिर पाडण्याचा हुकूम त्याचा सेवक मीर बकी याला दिला. त्या वेळी रामाच्या मूर्ती शामानंद सरस्वती या पुजाऱयांनी नदीच्या डोहात विसर्जित केल्या. चार पुजारी गाभाऱयाच्या बाहेर पहारा देत उभे राहिले. ते चारही पुजारी मारले गेले. या मूर्ती 1528 ते 1749 पर्यंत डोहात होत्या. सन 1749 ला नरसिंहराव मोघे या सत्पुरुषांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी त्या मूर्ती डोहातून बाहेर काढल्या व आज असलेल्या कालेराम मंदिरात प्रस्थापित केल्या.
हे एक राम पंचायतन आहे. श्रीराम, सीतामाता, चार भाऊ आणि पायाशी हनुमान अशा या मूर्ती. प्रभू राम इथे बद्धपद्मासनात बसले असून त्यांच्या डाव्या मांडीवर सीता आहे. पायाशी श्रीयंत्र असून शेजारी हनुमान आहेत. मढीकर, आंबेकर यांनी हे मंदिर सांभाळले. मढीकर यांनी हे देऊळ बांधले. तत्कालीन इंग्रज अधिकारी या देवळात येत असत. देवळाच्या मागे लोक कचरा करत म्हणून देवळाच्या मागची बाजूसुद्धा इंग्रज अधिकाऱयांनी देवस्थानला देऊन टाकली. रामजन्माचा उत्सव त्याकाळी 50 रुपयांत होत असे. दरवर्षी वाण्याकडून उधारीवर सामान घ्यायचे आणि उत्सव करायचा. वर्षभर वाण्याचे कर्ज फेडण्यात जायचे. उत्सवाच्या वेळी पुन्हा कर्ज. एके वर्षी वाण्याने उधारीवर वस्तू देण्यास नकार दिला. व्यवस्थापक आंबेकरांनी देवाला ही व्यथा सांगितली. पैसे उभे नाही झाले तर देवळाला कुलूप लावून किल्ली शरयूमध्ये टाकून द्यायची आणि आपण अयोध्या सोडून निघून जायचे ठरवले.
त्याच दिवशी एक बाई देवळात आल्या. घरी भांडण झाल्यामुळे आपल्या जवळ असलेल्या सगळ्या गोष्टी घेऊन वडिलांचा सल्ला घेऊन त्या देवळात राहायला आल्या. त्या बाईंनी आपल्या जवळचे 1200 रुपये आणि दोन सोन्याच्या बांगडय़ा रामाच्या सेवेत अर्पण केल्या. त्यावेळेपासून आजतागायत अव्याहत उत्सव सुरू आहे. आता या उत्सवाला 10 लाख रुपये खर्च होतो. अयोध्येतील रामाच्या मूळ मूर्ती असलेल्या या कालेराम मंदिराची व्यवस्था देशपांडे नामक मराठी गृहस्थ बघतात. अयोध्येतील स्वर्गद्वार भागात नागेश्वर मंदिराच्या पाठीमागे हे मंदिर आहे. प्रशस्त असे हे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात 15 कोटी रामनामाचा जप लिहिलेले कागद आहेत. त्या खोलीत आजही अनेक जण रामनामाचा जप लिहीत बसलेले असतात. संत श्री गोंदवलेकर महाराज या मंदिरात तीन वेळा चातुर्मासात राहून गेले आहेत. त्यांच्या मातोश्री त्यांना दरवेळी अयोध्येला नेण्यासाठी आग्रह करीत असत, पण महाराज अजून वेळ आली नाही असे सांगून मातोश्रींना घेऊन येत नव्हते. मात्र एके वर्षी गोंदवलेकर महाराज आपल्या आईला अयोध्येला रामाच्या दर्शनासाठी घेऊन आले. श्रीरामाच्या दर्शनानंतर त्या माऊलीने याच कालेराम मंदिरात आपला देह ठेवला अशीही या मंदिराची महती आहे.
इथले अजून एक वैशिष्टय़ म्हणजे इथे असलेली मारुतीरायाची मूर्ती दक्षिणाभिमुख असून ती स्त्राr रूपातली आहे. त्याची कथा अशी की, अहिरावणाने राम-लक्ष्मणाचे अपहरण करून त्यांना देवीला बळी देण्यासाठी तयार केले. हनुमंताला हे समजल्यावर तो पाताळात गेला आणि त्याने त्या देवीच्या मूर्तीत प्रवेश केला. अहिरावणाने या बंधूंना समोर आणल्यावर देवीच्या रूपातील मारुतीने श्रीरामांना शेवटची इच्छा विचारली. प्रभू रामांनी आपला भक्त हनुमंताला भेटायची इच्छा प्रकट केली. हनुमंत ही इच्छा ऐकून गहिवरले. इतक्या अवघड प्रसंगीसुद्धा श्रीरामांना आपली आठवण व्हावी हे समजल्याने हनुमंताला धन्य वाटले. त्याने त्याच देवीच्या रूपात अहिरावणाला आपल्या पायाखाली दाबून ठार केले आणि राम-लक्ष्मणांना घेऊन तो पृथ्वीवर आला. या देवीच्या रूपातील अशी ही मारुतीची मूर्ती इथे कालेराम मंदिरात बघायला मिळते.
या मंदिरात भाविकांची राहण्याचीसुद्धा सोय होते. पूर्वापार अनेक मराठी मंडळी अयोध्येला आली की, या मंदिरात राहत आले आहेत. अयोध्येच्या मध्यभागात असलेल्या स्वर्गद्वार इथे असलेले रामाच्या मूळ मूर्ती असलेले हे मंदिर अयोध्या भेटीत अवश्य बघायला हवे. श्री गोंदवलेकर महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही जागा अतिशय प्रसन्न आणि सात्त्विक भाव जागृत करणारी आहे. त्यांचे स्मरण करताना आपणही रामनामाचा काही जप करावा. शक्य असेल तर लिहून काढावा. अयोध्येतली इतकी आगळीवेगळी अशी ही वास्तू ज्याचा मराठी माणसांशी जवळचा संबंध आहे ती वेळ काढून बघितली पाहिजे. शक्य असेल तर इथे मुक्काम करावा. अन्यथा किमान तिथे जाऊन रामरायाच्या मूळ रूपाचे दर्शन तरी अवश्य घ्यावे.
Comments are closed.