अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांची हत्या झाली

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात एका भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. चंद्रशेखर पोले असे त्याचे नाव असून तो एका पेट्रोल पंपावर काम करत शिकत होता. तो मूळचा हैद्राबाद येथील असल्याची माहिती देण्यात आली आहे. तो उत्तर टेक्सास विद्यापीठात शिक्षण घेत होता. त्याने हैद्राबाद येथे दंतचिकित्सेचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. नंतर उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला. तेथे या विद्यापीठात त्याचे उच्च शिक्षण होत असताना, तो आपला  खर्च भागविण्यासाठी एका पेट्रोल पंपावर काम करत होता. त्याच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आहेत. टेक्सास पोलीस पुढचा तपास करीत आहेत.

त्याच्यावर आफ्रिकन अमेरिकन वंशाच्या समाजकंटकाने गोळ्या झाडल्या, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, त्याची हत्या का करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या भारतातील मातापित्यांनी त्याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी भारत सरकारचे साहाय्य मागितले आहे. अलिकडच्या काळात अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये चार भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत.

 

 

Comments are closed.