'कोल्ड्रिफ' खोकला सिरपने तीन राज्यांमध्ये बंदी घातली
मध्यप्रदेशनंतर तामिळनाडू, केरळचाही निर्णय : सेवनामुळे मुलांचा मृत्यू होत असल्याने घबराट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपबाबत देशभरात घबराट पसरली आहे. ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपचे सेवन केल्यामुळे राजस्थान आणि मध्यप्रदेशात बारा मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर मध्यप्रदेशनंतर आता केरळ आणि तामिळनाडू या राज्यांनीही या सिरपवर बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालय या सिरपचे नमुने गोळा करून चाचण्या करत आहे. तामिळनाडूमधील ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपच्या उत्पादन युनिटमधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये डायथिलीन ग्लायकोल (डीईजी) जास्त प्रमाणात आढळून आले आहे.
मध्यप्रदेशात नऊ आणि राजस्थानमध्ये तीन मुलांच्या मृत्यूनंतर ‘कोल्ड्रिफ’ सिरफवर सुरुवातीला मध्यप्रदेशात आणि त्यानंतर तामिळनाडूमध्ये बंदी घालण्यात आली. त्यानंतर शनिवारी सायंकाळी उशिराने केरळ सरकारनेही याबाबत निर्णय घेत बंदी जाहीर केली. या कफ सिरपवर आता तीन राज्यांनी बंदी घातली असली तरी या बंदीची व्याप्ती आणखी वाढू शकते.
तामिळनाडूत निर्मिती केंद्र, साठा जप्त
शनिवारी मध्यप्रदेशात कोल्ड्रिफ सिरपच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. दरम्यान, राजस्थानने डेक्सट्रोमेथोर्फन हायड्रोब्रोमाइड कफ सिरप आणि त्याची उत्पादक केसन्स फार्मा यावरही बंदी घातली. कंपनीचा जयपूरमध्ये एक प्लांट आहे. ‘कोल्ड्रिफ’ची निर्मिती तामिळनाडूतील कांचीपुरममध्ये करण्यात आली. मुलांच्या मृत्यूनंतर तामिळनाडू सरकारने गुरुवारी या औषधाचे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली. तसेच राज्यात या औषधाचा घाऊक आणि किरकोळ साठा जप्त करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे कफ सिरप खाल्ल्याने नऊ मुलांचा मृत्यू झाला. 24 ऑगस्ट रोजी पहिला संशयित रुग्ण आढळला आणि 7 सप्टेंबर रोजी पहिला त्याचा मृत्यू झालयानंतर 15 दिवसांत मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे एकामागून एक सहा मुलांचा मृत्यू झाला. मूत्रपिंडाच्या स्वॅबचे नमुने घेतल्यानंतर चाचणीत डायथिलीन ग्लायकोल दूषित झाल्याचे आढळले. प्राथमिक तपासणीत खोकला सिरपची संभाव्य समस्या असल्याचे दिसून आल्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी आणखी दोन मुलांचा मृत्यू झाला.
केंद्र सरकारकडून अॅडव्हायझरी जारी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ‘कोल्ड्रिफ’ सिरपबाबत आरोग्य सल्ला जारी केला. त्यानुसार दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकला सिरप (खोकला आणि सर्दीची औषधे) देण्यास पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकला सिरपमुळे 12 मुलांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर सरकारने हा सल्ला जारी केला. आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘डीजीएचएस’ याबाबत सविस्तर माहितीही दिली. औषध घेणाऱ्या मुलाचे बारकाईने निरीक्षण करावे, योग्य डोस द्यावा आणि शक्य तितक्या कमी वेळेसाठी द्यावे. कफ सिरप अनेक औषधांसह देऊ नयेत, असे ‘डीजीएचएस’च्या डॉ. सुनीता शर्मा यांनी सांगितले.
Comments are closed.