धावत्या लोकलमध्ये मोटरमन अत्यवस्थ, सतर्कतेने वाचले हजारो प्रवाशांचे प्राण

धावत्या लोकलमध्ये मोटरमनला अचानक अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती बिघडल्यामुळे लोकलवरील नियंत्रण सुटत असताना मोटरमनने प्रसंगावधान राखून गाडी बेलापूर स्थानकात थांबवली आणि हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. हा प्रकार हार्बर रेल्वे मार्गावर शुक्रवारी रात्री घडला. अस्वस्थ झालेल्या मोटरमनला रेल्वे प्रशासनाने तातडीने नजीकच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले. दुसरा मोटरमनच्या सहाय्याने ही गाडी पनवेलच्या दिशेने रवाना करण्यात आली. या प्रकारामुळे या मार्गावरील लोकल गाड्यांची सेवा सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून पनवेलच्या दिशेने जाणारी १०.५० ची लोकल नेरुळ परिसरात आल्यानंतर रेल्वे स्थानकावर पोहोचताच मोटरमन सी. मोडक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. मात्र अशा अवस्थेत गाडीवर नियंत्रण ठेवणे कठीण जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांनी त्वरित ब्रेक लावले. गाडी थांबल्यानंतर मोटरमन मोडक यांना बेलापूर रेल्वे स्थानकातच प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. या प्रकारामुळे हार्बरवरील लोकल गाड्यांची सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. मात्र कोणताही अनर्थ न घडल्यामुळे अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
मोटरमनची प्रकृती स्थिर
मोटरमन सी. मोडक यांनी प्रसंगावधान राखून घेतलेल्या निर्णयामुळे मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्यावर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले.
Comments are closed.