Marathwada Rain – कळंब तालुक्याला पुन्हा मुसळधार पावसानं झोडपलं; नद्यांना पूर, शेतात पाणी शिरल्यानं शेतकरी मेटाकुटीला

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यावर पुन्हा आभाळ कोसळले आहे. मुसळधार पावसाने धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

शनिवारी रात्री कळंब तालुक्यामध्ये धो-धो पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे बाभळगाव परिसरात थेट गावात पाणी शिरले. अनेक घरांमध्ये गुडघ्याएवढे पाणी साचले असून संसारोपयोगी साहित्य खराब झाल्याने नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. ग्रामीण भागाला जोडणारे कोठाळवाडी, भोगजी आणि खामसवाडी-मोहा हे रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांना आता लांबच्या आणि खडतर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. दरम्यान, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अंदोरा-बाभळगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

पावसाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. खामसवाडी शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून उभी पीकं आडवी झाली आहेत. सोयाबीन, मूग, उडीद, तूर यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

दरम्यान, कळंब तालुक्यातील दहिफळ येथे तेरणा नदीला पूर आल्याने गावचा संपर्क तुटला आहे. तसेच दहिफळ ओढ्याची पातळी धोक्याच्या टप्प्यावर पोहोचली असून प्रशासनानं नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असलेल्या ठिकाणी जाणं टाळावं आणि आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

विसर्ग वाढवला

मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या सांडव्याच्या सहा वक्रद्वारे एक मीटरने विसर्ग सुरू आहे. सध्या मांजरा नदीपात्रात १८,७४५ क्युसेक्स इतका विसर्ग होत असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Comments are closed.