कोलंबोमध्येही नो हँड शेक, हरमनप्रीत कौरनं पाकच्या कर्णधाराशी हस्तांदोलन टाळलं


कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबोमध्ये सामना सुरु झाला आहे. भारताचा या वर्ल्ड कपमधील दुसरा सामना आहे. कोलंबोच्या के आर. प्रेमदासा स्टेडियमध्ये मॅच सुरु आहे. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यामुळं भारत पहिल्यांदा फलंदाजी करत आहे. भारताला पहिला धक्का बसला असून स्मृती मानधना 23 धावा करुन बाद झाली.

Harmanpreet Kaur No Handshake Policy : हरमनप्रीत कौरनं हस्तांदोलन टाळलं

सूर्यकुमार यादवनं आशिया कपमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा सोबत हस्तांदोलन टाळलं होतं. तेच धोरण कर्णधार हरमनप्रीत कौरनं महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये राबवलं. हरमनप्रीत कौरनं पाकची कर्णधार फातिमा सना हिच्यासोबत हस्तांदोलन केलं नाही.

खेळाडूंना पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण्याबाबात कोणतेही निर्देश दिलेले नाहीत असं भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी यापूर्वीच म्हटलं. ते म्हणाले धोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आमचं लक्ष फक्त खेळावर आहे, असं सैकिया म्हणाले.

मोहसीन नक्वीच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने आले होते. भारतानं तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं होतं. या तीन सामन्यांमध्ये भारताच्या खेळाडूंनी पाकच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन टाळलं होतं. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पीसीबीचे चेअरमन मोहसीन नक्वीच्या हस्ते आशिया कपची ट्रॉफी स्वीकारण्यास भारतानं नकार दिला होता.

भारत सरकारच्या धोरणानुसार पाकिस्तान विरुद्धचे आयसीसी स्पर्धेतील सामने त्रयस्थ ठिकाणी आयोजित केले जातील. दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका खेळवल्या जाणार नाहीत. महिला वनडे वर्ल्ड कपचं आयोजन भारत आणि श्रीलंका करत आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेतील कोलंबोत होणार आहेत. आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. त्यावेळी देखील भारत आणि पाकिस्तानची लढत कोलंबोत होऊ शकते. याशिवाय पाकिस्तानचे सामने देखील कोलंबोत होतील.

भारताचा संघ : प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रुचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, रेणुका ठाकूर, नल्लापुरेड्डी चरणी, क्रांती गौड

पाकिस्तान संघ: मुनिबा अली, सदाफ शमास, सिड्रा अमीन, रुमिन शमीम, आलिया रियाज, सिद्रा नवाझ (विकेटकीपर), फातिमा साना (कॅप्टन), नतालिया परवेझ, डायना बाग, सादिया इक्बाल, नॅश्रा संधू.

आणखी वाचा

Comments are closed.