रोहितकडून कर्णधारपद काढून घेण्यामागचं कारण स्पष्ट! मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा मोठा खुलासा
साधारण 8 महिन्यांपूर्वी आपल्या कर्णधारपदाखाली भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions trophy 2025) जिंकवून देणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) पुढील एक-दोन वर्षे नव्हे, तर 2027 च्या विश्वचषकातही भारताचा कर्णधार असेल, असे जवळजवळ सर्वांनी मानले होते. मात्र शनिवारी जाहीर झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या (Aus vs Ind) वनडे संघात आगरकर आणि त्यांच्या निवड समितीने कसोटी कर्णधार शुबमन गिलला (Shubman gill) वनडे संघाचेही नेतृत्व सोपवत सर्व अंदाज आणि चर्चांना धक्का दिला.
हा निर्णय मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि बीसीसीआय सचिव देवाजीत सैकिया (Devjit Sakiya) यांच्याशी चर्चा करून घेतला.
प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहितने स्पष्ट केले की, त्याला या निर्णयाची आधीच माहिती देण्यात आली होती. पण जेव्हा आगरकर यांना रोहित आणि विराट 2027 चा विश्वचषक खेळणार का याविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी तो प्रश्न टाळला.
आगरकर म्हणाले, तीन फॉरमॅटमध्ये तीन वेगवेगळे कर्णधार असणं हे खूपच अव्यवहार्य आहे. म्हणूनच आम्ही शुबमन गिलला वनडे कर्णधार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुढे सांगितले, रोहित आणि विराट सध्या फक्त हाच एक फॉरमॅट खेळत आहेत. 2027 च्या विश्वचषकाविषयी बोलण्याची आज गरज नाही. पण कर्णधार बदलण्याचा विचार मात्र आमच्या मनात होता.
ते पुढे म्हणाले, खरं तर या निर्णयामागे अनेक कारणं होती. पहिलं म्हणजे, खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार असणं ही प्लॅनिंगच्या दृष्टीने योग्य गोष्ट नाही. दुसरं म्हणजे, पुढचा विश्वचषक कुठे आणि कधी आहे, याचा विचार करावा लागतो आणि वनडे हा आता सर्वांत कमी खेळला जाणारा फॉरमॅट आहे. अशा परिस्थितीत पुढच्या रांगेतील खेळाडूंना फारसे सामने मिळत नाहीत. त्यात एखादा नवा खेळाडू कर्णधार होणार असेल, तर त्याला स्वतःला तयार होण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी सामन्यांचा अनुभव मिळणं आवश्यक असतं.
आगरकर यांनी मात्र रोहितने या निर्णयावर काय प्रतिक्रिया दिली हे उघड केले नाही. पण त्यांनी हे मान्य केले की रोहितकडून कर्णधारपद काढून घेणं हा खूप कठीण निर्णय होता.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे केवळ 8 महिन्यांपूर्वीच रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आगरकर म्हणाले, रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला नसता, तरी त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेणं हे तितकंच अवघड ठरलं असतं, कारण त्याने भारतासाठी कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पण कधीकधी आपण भविष्यात काय करायचं आहे, संघ कुठे उभा आहे आणि संघाच्या हितासाठी काय सर्वोत्तम आहे, याचा विचार करावा लागतो. आता हा निर्णय आज घ्या किंवा सहा महिन्यांनी, असे निर्णय घ्यावेच लागतात.
Comments are closed.