‘गिलला यशस्वी व्हायचं असेल, तर रोहितचे गुण आत्मसात करावे लागतील…’ भज्जीचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी म्हटले आहे की बीसीसीआयने शुबमन गिलला वनडे संघाचा कर्णधार बनवण्याचा निर्णय हा 2027 विश्वचषक लक्षात घेऊन घेतला आहे. भज्जी यांनी हेही सांगितले की गिलला पुढील यश मिळवण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वगुणांची गरज भासेल.

हरभजन सिंग म्हणाले, “शुबमन गिलची कर्णधारपदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तो बीसीसीआयच्या भविष्यातील गोष्टींचा विचार करून घेण्यात आलेला निर्णय आहे. या निर्णयामागे वनडे विश्वचषक 2027 हे मुख्य कारण आहे. हा निर्णय त्या स्पर्धेच्या दृष्टीने घेतला गेला आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावर कायम ठेवता आले असते, कारण त्याने आजवर संघाचे नेतृत्व उत्कृष्टपणे केले आहे. ड्रेसिंग रूममध्ये त्याला मोठा सन्मान आहे आणि खेळाडू देखील त्याचा खूप आदर करतात. पण निवड समितीने भविष्यातील विचार करून हा निर्णय घेतला आहे.”

हरभजन सिंग म्हणाले, “इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेत गिलने आपल्या कर्णधारपदाने प्रभाव टाकला होता. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्धची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली होती. रोहितने संघाला एकत्र ठेवले आहे. जर तुम्ही वनडेमधील त्याच्या यशाचे प्रमाण पाहिलेत, तर ते खूपच जास्त आहे. तो कर्णधार राहू शकला असता, पण मला वाटते हा निर्णय भविष्यातील विचार करून घेतला गेला आहे. रोहितला त्याच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. जरी तो आता कर्णधार नसला, तरी संघात त्याचा सन्मान तसाच राहील. संघाला पुढेही रोहितच्या नेतृत्वगुणांची गरज भासणार आहे.”

शनिवारी हरभजन सिंह यांनी जिओ-हॉटस्टारवर बोलताना सांगितले की, “रोहितने आपल्या नेतृत्वाखाली भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले होते. पण ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी तो कर्णधार नाही, हे माझ्यासाठी धक्कादायक आहे.”

भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली. वनडे संघात नेतृत्वात बदल करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या जागी आता शुबमन गिल वनडे संघाचा कर्णधार असेल, तर श्रेयस अय्यरला गिलच्या जागी उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

Comments are closed.