सोने आणि चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, दर आणखी वाढणार, ‘या’ म्युच्युअल फंडनं वर्तवला अंदाज


सुवर्ण दर नवी दिल्ली : 2025 मध्ये सोने आणि चांदीमध्ये   गुंतवणूक करणाऱ्यांना जोरदार परतावा मिळाला आहे. सोने आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. 31 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 75 हजारांच्या दरम्यान होता. तो सध्या 1 लाख 20 हजारांच्या जवळ पोहोचला आहे.

सोने आणि चांदीचे दर वाढण्यामागं प्रमुख कारण जागतिक आर्थिक अनिश्चितता, केंद्रीय बँकांकडून केली जाणारी खरेदी आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात केली जाणारी कपात ही आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादल्यानं अनिश्चितता वाढली आहे.

टाटा म्युच्युअल फंडच्या रिपोर्टनुसार आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोन्यानं चांगली कामगिरी केली आहे. 2008 च्या आर्थिक संकटाच्या काळात 2008 ते 2011 दरम्यान सोन्याचे दर दुप्पट झाले होते.  करोनाच्या काळात 2020 मध्ये सोन्याचे दर 53 टक्क्यांनी वाढले होते. यंदा सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

सोने दर वाढीमागं अनेक कारणं आहेत, त्यामध्ये जगभरातील केंद्रीय बँकांकडून वाढवण्यात आलेली सोने खरेदी हे एक कारण आहे.भारतात आरबीआयनं देखील सोने खरेदी वाढवली आहे. अमेरिकेच्या फेड रिझर्व्हनं व्याज दरात 25 बेसिस पॉईंटची कपात केल्याचा परिणाम सोने दरावर दिसून आला आहे.

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध आणि मध्य पूर्वेतील अस्थिरतेमुळं सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित पर्याय मानला जात आहे. भारतात 85 टक्के सोनं आयात केलं जातं. रुपया कमजोर झाल्यानं परतावा वाढला आहे.

टाटा म्युच्युअल फंडच्या अंदाजानुसार येत्या काळात शॉर्ट टर्ममध्ये सोनं 3500 ते 4000 डॉलर प्रति औंसच्या दरम्यान राहू शकतं. ज्यावेळी सोन्याचे दर कमी होतील तेव्हा हळू हळू सोन्यात गुंतवणूक करावी.ज्यामुळं दीर्घ काळात महागाई आणि इतर जोखमीच्या काळात सुरक्षा देऊ शकतील.

चांदीच्या दरात सोन्यापेक्षा अधिक वाढ झाली आहे. चांदीचे दर 61 टक्क्यांनी वाढले आहेत.औद्योगिक क्षेत्रातील मागणी वाढल्यानं चांदीचे दर वाढले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, ग्रीन टेक्नोलॉजी आणि सोलर पॅनेल सारख्या क्षेत्रात चांदीची मागणी वाढली आहे. भारतात जवळपास 92 टक्के चांदी आयात केली जाते. टाटा म्युच्युअल फंडनं संतुलित गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 50 टक्के सोन्यामध्ये आणि 50 टक्के चांदीमध्ये गुंतवणूक करावी, असा सल्ला दिला आहे.

सोने ज्या प्रमाणं गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय आहे त्याच प्रमाणं भारतात विविध सणांच्या काळात सोने खरेदीला प्राधान्य दिलं जातं. सोन्यातील गुंतवणूक नेहमीच फायदेशीर ठरली आहे. लग्नसराईच्या काळात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.