कोल्ड्रिफ सिरप कंपनीविरूद्ध कारवाईची तयारी

मुलांच्या मृत्यूनंतर गंभीर दखल : केंद्रीय आरोग्य सचिवांची राज्ये-केंद्रशासित प्रदेशांसोबत उच्चस्तरीय बैठक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरप सेवनाने 12 मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे देशभरात चिंता निर्माण झाली आहे. या सिरपमुळे मुले आजारी पडल्याच्या बातम्या केवळ मध्यप्रदेशातच नव्हे तर राजस्थान आणि महाराष्ट्रातही समोर आल्या आहेत. या घटनेनंतर मध्यप्रदेश सरकारने मोठी कारवाई केली आहे. सरकारने श्रीसन फार्मास्युटिकल्स या कंपनीच्या सर्व उत्पादनांवर बंदी घातली आहे. यामध्ये कोल्ड्रिफ कफ सिरपचाही समावेश आहे. दरम्यान, कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉ. प्रवीण सोनी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला असून तामिळनाडूस्थित उत्पादक कंपनी, श्रीसन फार्मास्युटिकल्सला प्रमुख आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे.

मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने (सीडीएससीओ) सहा राज्यांमधील औषध उत्पादन युनिट्सची जोखीम-आधारित तपासणी सुरू केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात ही तपासणी सुरू असून एकूण 19 औषधांचे नमुने (खोकल्याची औषधे, प्रतिजैविके आणि तापाच्या औषधांसह) गोळा करण्यात आले. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या तपासणीचे उद्दिष्ट औषध उत्पादन प्रक्रियेतील संभाव्य कमतरता ओळखणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणे हे आहे.

कोल्ड्रिफ सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरला अटक

मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे या कफ सिरपमुळे झालेल्या मुलांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली आहे. मध्यप्रदेश पोलिसांनी छिंदवाडा येथील परसिया येथील डॉ. प्रवीण सोनी यांना अटक केली आहे. परसिया येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी यांनी सर्दी आणि खोकल्यापासून ग्रस्त मुलांना सिरपची शिफारस केल्याचे वृत्त आहे. सदर सिरप सेवनामुळे अनेक मुलांचा मृत्यू झाला. सिरप सेवनामुळे मुलांचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा संशय आहे.

डॉ. सोनी यांच्यावर निलंबनाचीही कारवाई

कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी मध्यप्रदेशातील मोहन यादव सरकारने महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. राज्य सरकारने छिंदवाडा येथील डॉक्टर प्रवीण सोनी यांना निलंबितही केले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या सूचनेनुसार, छिंदवाडा जिह्यातील पारसिया येथे तैनात असलेले बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. त्यांना रुग्णांच्या उपचारात निष्काळजीपणा केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या निलंबनानंतर त्यांना जबलपूर येथील प्रादेशिक आरोग्य सेवा कार्यालयाशी जोडण्यात आले आहे.

Comments are closed.