विजय आपलाच! पुरुषांनंतर महिला संघानेही वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा फडशा पाडला, टीम इंडियाचा दमदार विजय

रविवारी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025च्या सहाव्या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा 88 धावांनी पराभव केला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा विश्वचषकातील हा दुसरा विजय होता, तर पाकिस्तानला स्पर्धेत सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने 50 षटकांत सर्वबाद 247 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान 43 षटकांत सर्वबाद 159 धावाच करू शकला. पाकिस्तानकडून सिद्राने सर्वाधिक 81 धावा केल्या. भारताकडून क्रांती आणि दीप्तीने प्रत्येकी तीन बळी घेतले.

248 धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. मुनीबा अली धावबाद झाली आणि पॅव्हेलियनमध्ये परतली. सदाफ शमास 6 धावा करून बाद झाली. क्रांती गौरने तिला बाद केले. आलिया रियाजने फक्त दोन धावाच केल्या. सिद्रा अमीन आणि नतालिया परवेझच्या जोडीने चौथ्या विकेटसाठी 69 धावा जोडत डाव सावरला. गौडने परवेझ (33) ला बाद करून ही भागीदारी संपवली. त्यानंतर, भारतीय गोलंदाजी आक्रमणासमोर कोणताही पाकिस्तानी फलंदाज जास्त काळ टिकू शकला नाही. सिद्रा अमीनने 81 धावा केल्या शेवटी तिला स्नेह राणाने बाद केले. दीप्ती शर्माने 43व्या षटकात सादिया इक्बाल (0) ला बाद केले, ज्यामुळे पाकिस्तानचा डाव 159 धावांवर संपला. हा भारताचा पाकिस्तानवरील सलग 12वा विजय आहे.

रविवारी पाकिस्तान महिलांविरुद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघाने 50 षटकात सर्वबाद 247 धावा केल्या. प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी करत भारतीय संघाला दमदार सुरुवात दिली. स्मृती मानधना 32 चेंडूत 23 धावा करून बाद झाली. सलामीवीर प्रतिका रावल 37 चेंडूत 31 धावा करून बाद झाली.

सादिया इक्बालने तिला क्लीन बोल्ड केले. कर्णधार हरमनप्रीत कौर 34 चेंडूत फक्त 19 धावा करू शकली. डायना बेगने तिचा बळी घेतला. हरलीनने 65 चेंडूत 46 धावा केल्या. डासांना पळवून लावण्यासाठी स्प्रेचा वापर करण्यात आला, ज्यामुळे सामना काही काळासाठी थांबवण्यात आला. जेमिमा रॉड्रिग्जने 37 चेंडूत 32 धावा केल्या. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज बेगने चार तर फातिमा सनाने दोन बळी घेतले

Comments are closed.