सर एकाच वेळी देशभर

वृत्तसंस्था/ पाटणा

राजकीय पक्ष बिहार विधानसभा निवडणुकीत सक्रियपणे सहभागी असताना, निवडणूक आयोगानेही त्यांची तयारी पूर्ण केली आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर रोजी संपत असल्यामुळे येथील निवडणूक प्रक्रिया 22 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी जाहीर केले. तसेच ‘एसआयआर’ची प्रक्रिया बिहारमध्ये यशस्वी ठरली असून आता संपूर्ण देशभर ती राबविली जाईल असेही त्यांनी जाहीर केले.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक गेल्या तीन दिवसांपासून बिहारमध्ये सक्रिय आहे. या काळात अधिकाऱ्यांनी पाटणा येथे राजकीय पक्ष, प्रशासकीय निवडणूक अधिकारी, उच्च राज्य प्रशासकीय अधिकारी, अंमलबजावणी संस्था, मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ), विशेष पोलीस नोडल अधिकारी (एसपीएनओ) आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) नोडल अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. या बैठकांमधून निवडणुकीची संपूर्ण तयारी सुनिश्चित केल्यानंतर रविवारी दुपारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

लवकरच अधिसूचना शक्य

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात एकाच वेळी एसआयआर (विशेष सघन सुधारणा) केली जाईल. अलिकडेच झालेल्या सीईओंच्या परिषदेत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यासंबंधी आता आयोग लवकरच अधिसूचना जारी करू शकते. तथापि, देशभरात एसआयआर सुरू होण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मुख्य निवडणूक आयुक्तांनी बिहारमधील निवडणुकीत आयोगाने सुरू केलेले नवीन उपक्रम भविष्यात देशभरात राबविले जातील, असेही जाहीर केले आहे.

राज्यांच्या आढावा बैठका

सीईओंच्या परिषदेत विविध राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या तयारीची माहिती आयोगाला सादर केली. बैठकीत राज्यांनी ‘एसआयआर’साठी त्यांच्या तयारीची पातळी आणि त्यांना येऊ शकणाऱ्या आव्हानांची माहिती दिली. बहुतांश राज्यांमध्ये पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. आता ठराविक राज्यांमधील कागदपत्रे अंतिम करण्यासाठी आयोग ईशान्येकडील राज्यांसोबत स्वतंत्र बैठका घेईल. आयोगाच्या मते बिहारप्रमाणे प्रत्येक राज्यासाठी 11 कागदपत्रे असणे बंधनकारक नाही. ओळखीच्या पुराव्यासाठी ओळखपत्रांची यादी प्रत्येक राज्यात वेगवेगळी असू शकते.

‘एसआयआर’ म्हणजे काय?

‘एसआयआर’ किंवा विशेष सघन सुधारणा ही मतदार यादीची एक विशेष परीक्षण पद्धती आहे. या प्रक्रियेदरम्यान मतदारयाद्यांचा व्यापक आढावा घेतला जातो. ज्यामध्ये नवीन मतदारांची भर घालणे, मृत किंवा स्थलांतरित मतदारांना काढून टाकणे आणि यादीचे परीक्षण करणे आदी प्रक्रिया समाविष्ट आहेत.

मतदान केंद्रांवर सुटसुटीतपणा

बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा असून निवडणुका वेळेवर होतील, असेही निवडणूक आयोगाने सांगितले. यादरम्यान आता कोणत्याही मतदान केंद्रावर 1,200 पेक्षा जास्त मतदार राहणार नाहीत. या व्यवस्थेमुळे मतदान प्रक्रिया आणि सुरक्षा दोन्ही सुधारतील. बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) आता मतदारांशी थेट संपर्क साधतील आणि त्यांना ओळख पटवण्यासाठी ओळखपत्रे देण्यात आली आहेत. शिवाय, मोबाईल फोन जमा करून मतदान करण्याची पद्धत सुरू केल्यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर त्यांचे मोबाईल फोन आणता येणार नाहीत, असेही निवडणूक आयोगाने सांगितले.

मतदान केंद्रांवर 100 टक्के वेबकास्टिंग

बिहारमध्ये वन-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म लागू केला जाईल. आता, प्रत्येक उमेदवार मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर त्यांचा एजंट तैनात करू शकतो. सर्व मतदान केंद्रांवर 100 टक्के वेबकास्टिंग केले जाईल. ईव्हीएममध्ये आता ब्लॅक अँड व्हाईट मतपत्रिकांऐवजी रंगीत फोटो आणि अनुक्रमांक असलेल्या मतपत्रिका वापरल्या जातील. या मतपत्रिकांमुळे उमेदवारांची ओळख पटवणे सोपे होईल आणि मतदान प्रक्रिया पारदर्शक होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

Comments are closed.