भारताचा पाकिस्तानवर सलग 12वा धडाकेबाज विजय! क्रांती गौडने पाकिस्तानचं कंबरडं मोडलं
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 मध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलग दुसरा आणि पाकिस्तानविरुद्ध 12वा विजय मिळवला. रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 88 धावांनी पराभव करत आपला विक्रम कायम ठेवला.
भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 10 गडी गमावून 247 धावा केल्या. संथ आणि वळण घेणाऱ्या खेळपट्टीवर सुरुवातीला भारतीय फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला. सलामीवीर प्रतीका रावल (31) हिने जलद सुरुवात दिली, परंतु स्टार फलंदाज स्मृती मानधना (23) पुन्हा एकदा पॉवरप्लेमध्ये बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर (19) आणि हरलीन देओल (46) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हरलीनने संयमाने खेळ करत मधल्या फळीत महत्त्वाची भागीदारी केली.
त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज (32), दीप्ती शर्मा (25) आणि स्नेह राणा (20) यांनी लहान पण उपयोगी डाव खेळले. अखेरीस रिचा घोषने तुफानी फलंदाजी करत 20 चेंडूत नाबाद 35 धावा ठोकल्या आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. पाकिस्तानकडून डायना बेग सर्वाधिक प्रभावी ठरली; तिने 10 षटकांत 4 विकेट घेतल्या, तर कर्णधार फातिमा सनाने 2 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवातच डळमळीत झाली. सलामीवीर मुनीबा अली (2) धावबाद झाली, त्यानंतर क्रांती गौडने आठव्या षटकात सदाफ शमास (6) ला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. पुढे तिने आलिया रियाज (2) आणि नतालिया परवेझ (33) यांनाही बाद करत पाकिस्तानचा कणा मोडला. पाकिस्तानच्या प्रमुख फलंदाज सिद्रा अमीनने 81 धावा केल्या, परंतु इतर खेळाडू अपयशी ठरल्या.
पाकिस्तानच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. अखेरीस पाकिस्तानचा डाव 43 षटकांत 159 धावांत संपला. भारताकडून क्रांती गौडने 10 षटकांत 20 धावांत 3 बळी घेतले आणि सामनावीर ठरली. दीप्ती शर्मानेही 3 विकेट घेतल्या, तर स्नेह राणाने 2 बळी घेतले.
या विजयासह भारताने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील आपला 12वा सलग विजय नोंदवला आहे. पाकिस्तान महिला संघाने आजवर भारताविरुद्ध कधीही एकदिवसीय सामना जिंकलेला नाही. विश्वचषकातही हा भारताचा पाकिस्तानविरुद्ध पाचवा विजय ठरला.
Comments are closed.