विधिमंडळ समित्यांना चाप, सर्व दौरे रद्द

>> राजेश चुरी

धुळय़ातील रेस्ट हाऊसमध्ये बेहिशेबी रोकड सापडल्याच्या प्रकरणानंतर विधिमंडळाच्या समित्यांचा विषय जोरदार चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा या समित्यांचा विषय चर्चेत आला आहे. कारण राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ समित्यांच्या दौऱयांना चाप बसला असून या समित्यांचे सर्व दौरे रद्द करण्याचे आदेश विधिमंडळ सचिवालयाने जारी केले आहेत. त्यामुळे आमदारांमध्ये नाराजी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

धुळे जिह्याच्या दौऱयावर असलेल्या विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या दौऱयात गुलमोहर या शासकीय विश्रामगृहातील खोलीत रोकड सापडली होती. ही खोली शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर आरक्षित केली होती. या प्रकारानंतर विधिमंडळाच्या समितीचे दौरे चर्चेत आले होते.

लोकलेखानंतर अंदाज समिती महत्त्वाची मानली जाते. या समितीच्या धुळे दौऱ्यातच समिती प्रमुखांच्या सचिवांच्या कक्षात 1 कोटी 84 लाख रुपयांची रोख रक्कम आढळली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. या प्रकारानंतर या समितींचाच विषय चर्चेत आला आहे.

सरकारच्या कामावर देखरेख ठेवण्याकरिता विविध समित्या स्थापन करण्यात येतात. सभागृहात छोटय़ामोठय़ा कामकाजाला अधिक वेळ मिळत नाही. समित्यांच्या माध्यमातून सभागृहात चर्चा करता येत नाही अशा विषयांवर चर्चा केली जाते. तसेच सरकारच्या वतीने केल्या जाणाऱया कामांची या समित्यांकडून पाहणी केली जाते. समितीचे सदस्य दौरे करून शासनाच्या कामकाजाचा आढावा घेतात. समितीचे अहवाल विधिमंडळाला सादर केले जातात, पण अहवाल सरकारवर बंधनकारक नसतात.

समितीमध्ये कोण असते

या समित्यांमध्ये विधानसभा व विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांमधील सदस्यांचा समावेश असतो. विधिमंडळाच्या कामकाजाला पूरक म्हणून विविध समित्या स्थापन केल्या जातात.

काही वेळा दौऱ्यात आमदारांनी अधिकाऱयांकडून महागडय़ा भेटवस्तूंची मागणी केल्याची तक्रार एका अधिकाऱयाने केली होती. त्यावरून मोठी खळबळ माजली होती. या समित्यांच्या दौऱ्यांवरून बऱयाच तक्रारी आल्याने बाबासाहेब कुपेकर अध्यक्ष असताना त्यांनी आमदारांचे दौरे बंद केले होते. पण सरकारी पैशाने पर्यटन तेव्हा बंद पडल्याने काही आमदार नाराज झाले होते असे सांगण्यात येते. आता पुन्हा दौरे बंद केल्याने नाराजी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

आदेशात काय…

महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. राज्यातील अतिवृष्टीमुळे विविध उपाययोजना करण्यात स्थानिक जिल्हा प्रशासन व्यस्त आहे. त्यामुळे पुढील आदेश होईपर्यंत मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता राज्यातील सर्व जिह्यांत विधान मंडळ समित्यांचे दौरे आयोजित करू नयेत. यापूर्वी मंजूर झालेले दौरेही रद्द करण्यात आले आहेत.

पंधरापेक्षा अधिक समित्या

विधिमंडळात 15 पेक्षा अधिक विविध समित्या आहेत. लोकलेखा, अंदाज, सार्वजनिक उपक्रम, अशासकीय सदस्यांची विधेयके व ठराव, उपविधान, नियम, शासकीय आश्वासन, सदस्यांची अनुपस्थिती, अनुसूचित जाती कल्याण, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, पंचायत राज, रोजगार हमी, महिलांचे हक्क व कल्याण, इतर मागासवर्ग कल्याण, अल्पसंख्याक, विशेषाधिकार, विनंती अर्ज अशा समित्या आहेत.

Comments are closed.