दुर्गा मूर्ती विसर्जन दरम्यान ओडिशामध्ये हिंसाचार फुटला
कटकमध्ये तणाव : विहिंपने केले बंदचे आवाहन
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशातील कटकमध्ये रविवारी दुर्गा पूजा मूर्ती विसर्जनादरम्यान दोन गटांमध्ये हिंसाचार झाल्यामुळे तणाव निर्माण झाला. राजधानी भुवनेश्वरपासून काही मैलांवर असलेल्या कटक शहरातील दर्गाहबाजार परिसरातील हाथी पोखरीजवळ शनिवारी मध्यरात्रीनंतर दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हिंसाचार उसळला. या तणावानंतर विश्व हिंदू परिषदेने सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी शहरात 12 तासांचा बंद पुकारला आहे. या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे इतरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
काही स्थानिकांनी मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात वाजवल्या जाणाऱ्या संगीताला आक्षेप घेतल्यामुळे दोन गटात वाद निर्माण झाला. या वादाचे काही मिनिटातच हाणामारीत रुपांतरित झाल्यानंतर जमावाने छतावरून मिरवणुकीवर दगड आणि काचेच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले. कटकचे डीसीपी ऋषिकेश ज्ञानदेव हेसुद्धा जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गर्दी पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दुर्गा पूजा समितीच्या सदस्यांनी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत केलेल्या निदर्शनांमुळे विसर्जन सोहळा सुमारे तीन तास ठप्प झाला होता. पहाटेच्या सुमारास कडक सुरक्षेत विसर्जन प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यानंतर उर्वरित सर्व मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
Comments are closed.