जागतिक पॅरा ऍथलेटिक्समध्ये हिंदुस्थानची तीन पदकांची कमाई
पॅरा ऍथलेटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानने सातव्या दिवशी आणखी तीन पदके आपल्या झोळीत टाकत 22 पदकांसह तालिकेत दहावे स्थान मिळवले. तसेच ब्राझीलने पुन्हा एकदा आपले अव्वल स्थान मिळवताना चीनला मागे टाकले. ब्राझीलने 15 सुवर्णांसह 44 पदके जिंकली तर 13 सुवर्ण पदकांसह चीनने सर्वाधिक 52 पदके जिंकली आहेत.
एकताची रौप्य कामगिरी
क्लब थ्रो एफ-51 प्रकारात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तरीही अनुभवी एकता भानसाठी हा ऐतिहासिक दिवस ठरला.
गेल्या वर्षी सुवर्णपदक पटकावलेल्या एकताने अंतिम प्रयत्नात 19.80 मीटर फेक नोंदवून युक्रेनच्या झोया ओव्सीच्या (24.03 मीटर) मागे दुसऱया क्रमांकावर झेप घेतली.
40 वर्षीय एकता म्हणाली, ‘लक्ष्य सुवर्णपदकाचेच होते, पण तिसरे जागतिक पदक जिंकण्याचा आनंद वेगळाच आहे. गेल्या वर्षी सुवर्ण व 2023 मध्ये कांस्यपदक मिळवले होते. घरच्या मैदानावर स्पर्धा असल्याने थोडा दबाव होता, पण हेच क्रीडाक्षेत्राचे सौंदर्य आहे, आव्हाने स्वीकारावी लागतात.’
राणाचे द्वारा जागतिक पदक
42 वर्षीय माजी सैनिक आणि माईन ब्लास्टमधील जीवित बचावलेला सोमन राणाने शॉटपुट एफ-57 प्रकारात करिअरमधील पहिले जागतिक पदक पटकावले. गेल्या दोन पॅरालिम्पिक्समध्ये चौथा व पाचवा क्रमांक मिळाल्यानंतर अखेर त्याने जागतिक पातळीवर पदक जिंकत ऐतिहासिक यश मिळवले.
त्याचे पदक सुरुवातीला रौप्यपदक म्हणून जाहीर झाले होते, पण ब्राझीलच्या थियागो पॉलिनो दोस सांतोसच्या यशस्वी अपीलनंतर त्याला अखेरीस कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पॅरिस सुवर्णविजेता प्रवीणला कांस्य पॅरिस पॅरालिम्पिक्स सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार याने हाय जंप टी-64 प्रकारात दोन मीटरची झेप घेत हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करत कांस्यपदक पटकावले.
2023 मध्ये याच स्पर्धेत त्याला कांस्य आणि मागील वर्षी चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. पाठदुखीमुळे सरावात अडथळे आले असतानाही त्याने दमदार झेप घेतली.
Comments are closed.