लेह हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करा

सोनम वांगचुक यांची मागणी

वृत्तसंस्था/लेह

पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी लेह हिंसाचारात चार जणांच्या मृत्यूची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात वांगचुक यांना अटक झाली असून ते सध्या जोधपूर मध्यवर्ती कारागृहात कैद आहेत. या कारागृहातूनच एका पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली. या पत्रात त्यांनी चार जणांच्या मृत्यूची चौकशी स्वतंत्र न्यायिक आयोगाकडून झाली पाहिजे. जोपर्यंत या प्रकरणाची न्यायिक चौकशी होऊन सत्य बाहेर पडत नाही तोपर्यंत मी तुरुंगातच राहीन, असे नमूद केले आहे.

वांगचुक यांनी लिहिलेले पत्र लेह एपेक्स बॉडीचे कायदेशीर सल्लागार वकील मुस्तफा हाजी यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. मुस्तफा हाजी आणि वांगचुक यांचे भाऊ त्सेतान दोर्जे ले यांनी 4 ऑक्टोबर रोजी तुरुंगात वांगचुक यांची भेट घेतली होती. या भेटीत झालेल्या चर्चेदरम्यान या पत्रासंबंधीची चर्चाही झाली होती. 24 सप्टेंबर रोजी लेह हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत वांगचुक यांना 26 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. ते सध्या जोधपूर तुरुंगात आहेत.

हेबियस कॉर्पस याचिकेवर आज सुनावणी

वांगचुक यांच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन. व्ही. अंजारिया यांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करेल. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. अँग्मो यांनी 2 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. गीतांजली यांनी कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करताना आपल्या पतीची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता.

Comments are closed.