सध्याचा युग अस्पृश्य युद्धांपैकी एक आहे.
एस. जयशंकर यांचे महत्वपूर्ण विधान, अमेरिकेशी व्यापार करार निश्चित होणार असल्याचा विश्वास
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सांप्रतच्या काळात तंत्रवैज्ञानिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे सध्याचे युग हे ‘अस्पर्श’ युद्धाचे (काँटॅक्टलेस वॉर) आहे. भारतानेही यासाठी स्वत:ला सज्ज केले असून कोणत्याही प्रकारचा हल्ला करण्याचा प्रयत्न कोणी केल्यास त्याला जन्मभर लक्षात राहील असा धडा दिला जाईल, अशा अर्थाचे महत्वपूर्ण प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी केले आहे.
ते रविवारी येथील चौथ्या ‘कौटिल्य आर्थिक परिषदे’त भाषण करीत होते. आज जगभरात परस्परविरोधी आणि विसंगत वातावरण निर्माण झाले आहे. धोका पत्करणे आणि धोका कमी करणे या दोन्ही कार्यवाही एकाच वेळी होत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे जगभरातील धोरणकर्त्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून त्यावर तोडगा काढणे आवश्यक झाले आहे, अशी मांडणी करताना त्यांनी काही महत्वाचे मुद्ध उपस्थित केले.
युद्धतंत्रात आमूलाग्र परिवर्तन
आज तांत्रिक प्रगतीमुळे युद्ध या संकल्पनेतच आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. शस्त्रास्त्रांचे स्वरुपही पूर्णत: नवे झाले आहे. हे युग अस्पर्श युद्धाचे आहे. या युद्धांमध्ये दोन्ही बाजूंचे सैनिक एकमेकांना भिडत नाहीत. तर दूरसंचालित शस्त्रांच्या साहाय्याने एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा युद्धांमध्ये मानवहानी कमी होते. तथापि, मालमत्तेची हानी अधिक होते. भारताही आता अशा युद्धांमध्ये प्रवीण होत असून या दिशेने देशाची वाटचाल वेगाने होत आहे. सध्याच्या काळात आम्ही अशी अनेक युद्धे पाहिली आहेत. इस्रायल-इराण, अर्मेनिया-अझरबैजान आणि इस्रायल-हमास ही सध्याच्या काळातली युद्धे या प्रकारची आहेत. हे नवे तंत्र आहे. या युद्धांमध्ये उपयोगात आणली जाणारी शस्त्रेही नवी आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने सज्जता राखणे प्रत्येक देशासाठी आवश्यक झाले आहे, असेही अनेक मुद्दे एस. जयशंकर यांनी त्यांच्या भाषणात मांडले.
आर्थिक विरोधाभासाची स्थिती
युद्धतंत्राप्रमाणे आजचे आर्थिक तंत्रही नवीन आहे. परस्पर विरोधी धोरणे एकाचवेळी अवलंबिली जात आहेत. ही धोरणे जगाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकत आहेत. त्यामुळे एक विरोधाभासात्मक स्थिती निर्माण झाली आहे. एका दृष्टीने पाहिले, तर आर्थिक धोका पत्करण्यास प्रोत्साहन मिळताना दिसते. पण दुसऱ्या बाजूने विचार करता आर्थिक धोके कमी करणे योग्य ठरेल, अशीही जाणीव होते. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत आज काहीशी संभ्रमित अवस्था निर्माण झाली आहे. अशा स्थितीत धोरणे ठरविताना एक निश्चित भूमीका घेणे हे जटील काम आहे. काही काळानंतर कदाचित स्थिती स्पष्ट होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भारत-अमेरिका करार प्रगतीपथावर
भारत आणि अमेरिका यांच्यात एक व्यापक व्यापार करार करण्याच्या दृष्टीने चर्चा केली जात आहे. तथापि, अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लागू केल्याने काही तणाव निर्माण झाला आहे. तसेच रशियाकडून भारत कच्च्या इंधन तेलाची जी खरेदी करीत आहे. त्यासंबंधाने काही प्रश्न निर्माण झाले आहेत. करार होण्यापूर्वी या सर्व प्रश्नांवर तोडगा शोधणे आवश्यक आहे. तरीही आमची चर्चा थांबलेली नाही. ती पुढेही होतच राहील. तसेच, आव्हाने असली तरी त्यांच्यावर मात करुन दोन्ही देश एकमेकांशी एक व्यापारी करार करण्याविषयी सकारात्मक आहेत. त्यामुळे असा करार होईल, असा विश्वास मला वाटतो. नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत या कराराचा प्रथम टप्पा पूर्ण होऊ शकतो. आम्ही आशावादी आहोत आणि अशावादी राहण्यासारखी परिस्थितीही आहे. त्यामुळे तो गंभीर चिंतेचा विषय नाही, असेही प्रतिपादन एस. जयशंकर यांनी आपल्या भाषणात केले आहे.
आर्थिक स्थिती संभ्रमित करणारी…
ड सध्या जगात परस्परविरोधी धोरणांची चलती असल्याने स्थिती संभ्रमाची
ड हा संभ्रम दूर होण्यास आणखी काही कालावधी जाण्याची आवश्यकता
ड नव्या युद्धतंत्रासाठी भारतही सज्ज, आगळीक करणाऱ्यास धडा निश्चित
ड गेल्या 10 वर्षांमध्ये भारताची प्रगती उत्तम, दुणावला आमचा आत्मविश्वास
Comments are closed.