मेमन यांच्या ‘द गेम चेंजर’चे प्रकाशन

क्रिकेट प्रशासनात गेली चार दशके जोरदार योगदान देणारे विख्यात पीच क्युरेटर नदीम मेमन यांच्या क्रिकेट कार्यावर आधारित ‘द गेम चेंजर’ या कॉफी टेबल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबई क्रिकेट संघटनेच्या वांद्रे-कुर्ला क्रीडा संकुल क्लबमध्ये पार पडला.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी हिंदुस्थानी कसोटीपटू संजय मांजरेकर यांची उपस्थिती लाभली तसेच एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, हिंदुस्थानी महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडूलजी, माजी कसोटीपटू संजय बांगर, धवल कुलकर्णी  आणि अभिनेता मुकेश ऋषी खेळाडू उपस्थित होते. तसेच माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, मुंबई क्रिकेटचे वर्तमान व माजी खेळाडू तसेच अनेक शुभेच्छुकांनी या सोहळय़ाला आपली उपस्थिती लावली.

पुस्तकात शरद पवार, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, चंद्रकांत पंडित, करसन घावरी, वसीम जाफर, अभिषेक नायर, बलविंदर सिंग संधू, लालचंद राजपूत, शुभांगी कुलकर्णी आणि सुलक्षण कुलकर्णी यांनी मेमन यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले आहे. नदीम मेमन यांच्या कार्याची दखल घेत प्रा. रत्नाकर शेट्टी, अयाझ मेमन, मिलिंद वागळे, विलास गोडबोले आणि वासुदेव तांबे यांनी त्यांच्या विशेष नातेसंबंधांविषयी सांगितले.

सोहळ्यात ‘मिडास टच असलेल्या नदीम’ यांच्यासाठी खास रॅप गीतही सादर करण्यात आले. संजय मांजरेकर, संजय बांगर आणि अजिंक्य नाईक यांनी मेमन यांच्या गेल्या चाळीस वर्षांच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सध्याचे हिंदुस्थानी क्रिकेटपटू श्रेयस अय्यर, शिवम दुबे, यशस्वी जैसवाल तसेच माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, वसीम जाफर, इरफान पठाण, लालचंद राजपूत आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे मेमन यांना शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.