'माती' न्याहारी

आपल्यापैकी बहुतेकांच्या घरी सकाळी न्याहारी किंवा नाष्ता करण्याची पद्धत आहे. यासाठी अनेक पदार्थ केले जातात. पोहे, उप्पीट, इडली, दोसा, सामोसा आदी पदार्थ तर विशेषत्वाने न्याहारीचेच पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहेत. पण या सकाळच्या खाण्यात कोणी जर माती खात असेल, तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसणे स्वाभाविक आहे. पण आपल्याच देशात असणाऱ्या पंजाब या राज्यात ही प्रथा आहे. विशेष म्हणजे ही मातीची न्याहारी करण्याची अनुमती केवळ महिलांना आहे. पुरुषांना मात्र तसे करण्यास बंदी आहे, अशी स्थिती आहे.

अर्थातच, ही माती आपल्या नेहमीच्या तांबड्या किंवा काळ्या मातीसारखी नाही. तिला मुलतानी मिट्टी किंवा मुलातानी माती असे म्हणतात. ही पिवळ्या रंगांची माती मऊ आणि मुलायम असते. गेल्या कित्येक शतकांपासून या मातीचा उपयोग खाद्यपदार्थ म्हणून करण्याची प्रथा पंजाब राज्याच्या काही भागांमध्ये आहे. विशेषत: जिथे ही माती उपलब्ध आहे, तिथे ती खाण्याचे प्रमाणही अधिक आहे.

ही माती शिजवूनही खाल्ली जाते. ती प्रमुखत: पाकिस्तानातील मुलतान या प्रांतात मिळते. पण पंजाबमध्येही ती उपलब्ध आहे. तसेच पंजाबच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ती लोकप्रिय आहे. मात्र, ही माती खाण्याचे व्यसन लागले, तर ते शरीरासाठी धोकादायक ठरु शकते. माती खाण्याचे कारण असे, की तिच्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे हाडे घट्ट होतात. मॅग्नेशियम आणि लोहक्षारही तिच्यात आहेत. तथापि, पुरुषांनी ती खाल्ली, तर त्यांना मुतखडा किंवा किडनी स्टोन होण्याची शक्यता बळावते. म्हणून पुरुष ती खात नाहीत. महिलांच्या संदर्भात हा धोका अत्यंत कमी आहे. बारीक चूर्णाच्या स्वरुपात ही माती काहीशी खारट लागते. तिची हीच चव अनेक महिलांना आवडते. वैद्यक शास्त्रानुसार माती खाण्याची आवड हा एक विकार असून त्याला जिओफॅगी असे संबोधले जाते.

Comments are closed.