इराणी करंडकावर विदर्भाचाच कब्जा, तिसऱ्यांदा पटकावले जेतेपद, शेष हिंदुस्थानचा 93 धावांनी पराभव

हर्ष दुबेसह (4 विकेट) सर्वच गोलदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विदर्भाने अपेक्षेप्रमाणे शेष हिंदुस्थानला 93 धावांनी पराभूत करत तिसऱ्यांदा इराणी करंडकावर आपला हक्क गाजवला. चौथ्या दिवसाच्या अखेरीस 2 बाद 30 अशा स्थितीत असलेल्या ‘शेष हिंदुस्थान’ने शेवटच्या दिवशी विजयासाठी शर्थीची झुंज दिली; पण विदर्भाच्या गोलंदाजांनी त्यांचा डाव 73.5 षटकांत 267 धावांवर संपवला.
रविवारी सकाळी रजत पाटीदारला आदित्य ठाकरेने अवघ्या 10 धावांवर स्वतःच्या गोलंदाजीवर झेलबाद करीत विदर्भाच्या आशा पल्लवीत केल्या. त्यानंतर दर्शन नळकंडेने ऋतुराज गायकवाडला (7) माघारी पाठवले. यश ढुल आणि ईशान किशन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र 26 व्या षटकात हर्ष दुबेने ईशान किशनला (35) झेलबाद करून जोडी फोडली. सरांश जैन (29) आणि यश ढुल यांच्यात 53 धावांची भागीदारी झाली; पण पार्थ रेखडेने जैनला बाद करून विदर्भाला सहावे यश मिळवून दिले.
यानंतर यश ठाकूरने ढुलला बाद करत विजयाच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा दूर केला. ढुलने 117 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि एक षटकारासह 92 धावा केल्या. अखेरीस हर्ष दुबेने अंशुल कम्बोज (3) आणि आकाशदीप (0) यांना माघारी पाठवून डाव संपवला. त्याने गुनूर ब्रारला (7) बाद करत शेष हिंदुस्थानचा डाव 267 धावांवर संपवला. विदर्भाने दुसऱया डावात 93 धावांनी विजय मिळवला. विदर्भाकडून हर्ष दुबेने 4 बळी घेतले, तर आदित्य ठाकरे आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. पार्थ रेखडे आणि दर्शन नळकंडे यांनी एक-एक बळी घेतला.
याआधी, विदर्भाने पहिल्या डावात 342 आणि दुसऱ्या डावात 232 धावा केल्या होत्या. शेष हिंदुस्थानने पहिल्या डावात 214 धावा केल्या आणि विजयासाठी 361 धावांचे लक्ष्य मिळाले होते. विदर्भाने याआधी 2017-18 आणि 2018-19 हंगामातही इराणी चषक जिंकला होता. आतापर्यंत खेळलेल्या 63 जेतेपदांच्या सामन्यांमध्ये शेष हिंदुस्थानला 31 वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
Comments are closed.