क्रीडाविश्वात शोककळा! भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी वेस्ट इंडिज क्रिकेटवर दुःखाचा डोंगर
बर्नार्ड ज्युलियन यांचे निधन झाले: वेस्ट इंडिज क्रिकेट जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू बर्नार्ड ज्युलियन (Bernard Julien passes away) यांचे 75 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी त्रिनिदादच्या वालसेन (Valsayn) या शहरात अखेरचा श्वास घेतला. बर्नार्ड ज्युलियन हे 1975 मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा भाग होते. त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने त्याकाळी वेस्ट इंडिजला जागतिक क्रिकेटमध्ये वर्चस्व मिळवून दिले होते.
आपल्या कारकिर्दीत ज्युलियन यांनी 24 कसोटी आणि 12 एकदिवसीय सामने वेस्ट इंडिजकडून खेळले. त्यांनी एकूण 68 बळी घेतले आणि 952 धावा केल्या. वेगवान गोलंदाज आणि मधल्या फळीतील विश्वासार्ह फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने वेस्ट इंडिज क्रिकेट जगतासह संपूर्ण क्रीडाविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक माजी खेळाडूंनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून बर्नार्ड ज्युलियन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पहिला विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू काळाच्या पडद्याआड
1975 च्या पहिल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये बर्नार्ड ज्युलियन यांनी अफलातून कामगिरी केली होती. श्रीलंकेविरुद्ध 4 बळी घेत 20 धावा दिल्या, तर उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध 4 बळींसाठी फक्त 27 धावा दिल्या. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी 37 चेंडूंमध्ये 26 धावा करून महत्त्वाची खेळी केली. ते डावखुरे वेगवान गोलंदाज, आक्रमक फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जात होते.
लॉर्ड्सवर ठोकला संस्मरणीय शतक
वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांनी बर्नार्ड ज्युलियन यांना आठवत सांगितले, “तो नेहमी मैदानात आपलं 100 टक्के देत असतो. फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही भूमिकांमध्ये तो विश्वासार्ह खेळाडू होता. प्रत्येक सामन्यात त्याने स्वतःला झोकून दिलं. तो उत्तम क्रिकेटपटू होता.” ज्युलियन यांची कसोटी कारकीर्दही उल्लेखनीय होती. 1973 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध त्यांनी 121 धावांची विजयी खेळी केली होती, तर पुढच्या वर्षी त्याच संघाविरुद्ध त्यांनी 5 बळी घेतले होते.
भारताविरुद्ध कसोटी कामगिरी
चार वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, बर्नार्ड ज्युलियनने भारताविरुद्ध आठ कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये 204 धावा केल्या आणि 11 विकेट्स घेतल्या. या काळात, त्याने भारतात चार कसोटी सामने खेळले, तर उर्वरित चार वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेल्या. भारतात त्याने 93 धावा केल्या आणि नऊ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजमध्ये त्याने भारताविरुद्ध 111 धावा केल्या आणि दोन विकेट्स घेतल्या.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.