टीम कल्चरसाठी धोका…बीसीसीआयने रोहित शर्माचं कर्णधारपद का हिसकावलं?; Inside माहिती समोर!


रोहित शर्मा न्यूज: भारताच्या एकदिवसीय कर्णधारपदाचा रोहित शर्माचा कार्यकाळ संपला आहे. ऑस्ट्रेलियातील तीन सामन्यांच्या मालिकेपूर्वी, शनिवार, 4 ऑक्टोबर 2025 रोजी शुभमन गिलची नवीन कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली. पण, 38 वर्षीय रोहित शर्मा या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या संघाचा भाग आहे. दरम्यान, रोहित शर्माला हटवून शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याच्या निर्णयावर मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर यांनी प्रतिक्रिया दिली होती.

अजीत आगरकर यांनी सांगितले की, तिन्ही फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार ठेवणे जवळजवळ अशक्य आहे. मात्र, एका अहवालानुसार या मोठ्या निर्णयामागे आणखी एक महत्त्वाचे कारण दडलेले आहे, असे समोर आले आहे. निवडकर्त्यांना रोहित शर्माने ड्रेसिंग रूममध्ये आपली इच्छा लादावी असे वाटत नव्हते, ज्यामुळे संघाच्या वातावरणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या खुलाशामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

ड्रेसिंग रूमच्या वातावरणाची चिंता

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने या निर्णयामागचे खरे कारण स्पष्ट केले आहे. रोहित शर्मा यांनी कसोटी आणि टी20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असून आता ते फक्त वनडे सामने खेळतात. जो फॉरमॅट सर्वात कमी प्रमाणात खेळला जातो. त्यामुळे त्यांचे कर्णधारपद टिकवणे संघासाठी आव्हानात्मक ठरू शकले असते.

बीसीसीआयच्या सूत्राच्या मते, “रोहित हा खेळाडू म्हणून खूप मोठ्या दर्जाचा आहे. जर तो कर्णधार राहिला असता, तर ड्रेसिंग रूममध्ये त्याची स्वतःची विचारधारा प्रभावी ठरली असती. पण आता तो केवळ वनडे खेळतो, त्यामुळे संघाच्या वातावरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता होती.” निवडकर्त्यांना वाटले की मर्यादित फॉरमॅटमध्ये रोहितचा दीर्घकालीन प्रभाव टीम कल्चरवर योग्य ठरणार नाही.

गंभीर आणि आगरकर यांची 2027 वर्ल्ड कपसाठी दूरदृष्टी…

अहवालानुसार, हा निर्णय कोच गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर यांच्या सल्ल्यानुसार घेण्यात आला आहे. सुरुवातीला गंभीर यांनी संघाच्या बाबतीत फारसे हस्तक्षेप केले नव्हते, परंतु न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकातील पराभवानंतर त्यांनी संघाचे नेतृत्व अधिक ठामपणे हाताळण्यास सुरुवात केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, गंभीर आणि आगरकर हे 2027 च्या वनडे विश्वचषकाकडे लक्ष ठेवून भविष्यासाठी स्पष्ट योजना आखत आहेत. त्यांना वाटते की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीवर अचानक परिणाम होऊ नये. त्यामुळे गिलला लवकर कर्णधार बनवून पुढील दोन वर्षांत तो स्वतःच्या पद्धतीने संघ उभारू शकेल, अशी त्यांची भूमिका आहे. आता ऑस्ट्रेलियातील मालिकेत रोहित आणि कोहली दोघेही गिलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहेत. भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी हा निर्णय दूरदृष्टीने घेतलेले एक मोठे पाऊल मानले जात आहे.

हे ही वाचा –

Bernard Julien passes away : क्रीडाविश्वात शोककळा! भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी वेस्ट इंडिज क्रिकेटवर दुःखाचा डोंगर, पहिला विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू काळाच्या पडद्याआड

आणखी वाचा

Comments are closed.