IND vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्यात संताप व्यक्त केल्यामुळे, पाकिस्तानी खेळाडूला ICC ची मोठी शिक्षा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने पाकिस्तानी क्रिकेटपटू सिद्रा अमीनला (Sidra Ameen) आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा सुनावली आहे. महिला वर्ल्ड कपमध्ये गेल्या रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान (INDW vs PAKW) सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने 88 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा करणारी खेळाडू सिद्रा अमीन होती, तिने 81 धावा केल्या. पण बाद झाल्यानंतर तिने रागाच्या भरात मैदानावर जोरात बॅट आपटली. या वर्तनासाठीच ICC ने तिच्यावर कारवाई केली.

तिला आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. या कलमानुसार, कोणताही खेळाडू सामन्यादरम्यान क्रिकेटचे उपकरण, कपडे किंवा मैदानातील कोणतीही मालमत्ता यांना हानी पोहोचवू शकत नाही. ही घटना पाकिस्तानी डावाच्या 40व्या षटकात घडली, जेव्हा हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) तिला झेलबाद केले आणि त्यानंतर अमीनने संतापाने बॅट आपटली.

या वर्तनासाठी ICC ने तिला एक डिमेरिट पॉइंट दिला आहे. गेल्या 24 महिन्यांतील हा तिचा पहिलाच अपराध आहे. लेव्हल-1 च्या अपराधात खेळाडूला मॅच फीच्या 50 टक्के दंड किंवा एक-दोन डिमेरिट पॉइंट मिळू शकतात. या प्रकरणात दोन्ही अंपायर, तिसरे आणि चौथे अंपायर यांनीही सिद्राला दोषी ठरवले.

सिद्रा अमीनने आपली चूक मान्य केल्यामुळे ICC ला यावर स्वतंत्र सुनावणी घेण्याची गरज पडली नाही. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारी तीच खेळाडू होती. अमीनने 106 चेंडूत 81 धावा करून अर्धशतक झळकावले.

आता वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पुढचा सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. पाकिस्तान आपले पहिले दोन सामने हरल्याने गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. तर भारत सलग दोन सामने जिंकून पहिल्या स्थानावर आहे.

Comments are closed.