एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर महामंडळ उदासीन; पगारासाठी पैसे नाहीत, सरकारच्या मदतीची प्रतीक्षा

एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याबाबत राज्य परिवहन महामंडळाची उदासीनता सोमवारी उघड झाली. महामंडळ आर्थिक अडचणीत असून कामगारांच्या पगारासाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत प्रलंबित मागण्यांची पूर्तता कशी करणार? महामंडळाला सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे, असे स्पष्टीकरण महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या प्रतिनिधींना दिले. याबाबत परिवहन मंत्र्यांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक बोलावली असून त्याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
महायुती सरकारच्या काळात एसटी कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्यात महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर, दिवाळी भेट, सण उचल अशा आर्थिक मागण्यांचा समावेश आहे. महायुती सरकारच्या निक्रियतेविरोधात राज्यभरातील एसटी कामगारांनी 13 ऑक्टोबरपासून महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयापुढे धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या प्रशासनाने सोमवारी कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत बैठक बोलावली होती. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महामंडळाचे वित्तीय सल्लागार गिरीश देशमुख, महाव्यवस्थापक मोहनदास भरसट, मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनावडेकर, कामगार अधिकारी चंद्रकांत घाटगे आदी अधिकारी उपस्थित होते.
दिवाळीपूर्वी तोडगा काढा…
राज्यभरातील सर्व एसटी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संघटनांनी एकजुटीने लढा सुरू केला आहे. आर्थिक मागण्यांवर कुठल्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी तोडगा काढा, अशी आग्रही मागणी कृती समितीतर्फे करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रदीप धुरंधर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या लढय़ाला इतर संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे.
z एसटी कामगारांचा 2018 पासूनचा महागाई भत्ता थकीत आहे. कोर्टाने आदेश दिल्यानंतरही महागाई भत्त्याची थकबाकी दिलेली नाही. 2016 पासून वेतनवाढीचा दर एक टक्के देण्याचे मान्य करूनही तो अद्याप दिलेला नाही. घरभाडे भत्ता 10, 20, 30 टक्के लागू झालेला नाही आदी प्रश्नांकडे संयुक्त समितीने लक्ष वेधले आहे.
Comments are closed.