प्रभागरचनेला मंजुरी, जानेवारीच्या मध्यावर मुंबईत निवडणूक, महापालिकेत 227 वॉर्ड कायम

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असून आज सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर 308 हरकती-सूचनांनुसार अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग रचनेवर एकूण 494 हरकती-सूचना मुंबईकरांकडून नोंदवण्यात आल्या होत्या. त्यावरील सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने याला अंतिम मंजुरी दिली आहे. यामध्ये 227 वॉर्डची संख्या जैसे थेच आहे. त्यामुळे आता मतदार याद्या आणि आरक्षणाची प्रतीक्षा असून या प्रक्रियेला लागणारा एक महिन्याचा कालावधी पाहता जानेवारीच्या मध्यावर प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेने आगामी निवडणुकीसाठी 22 ऑगस्ट रोजी प्रारूप आराखडा जाहीर करून नागरिकांकडून सूचना-हरकती मागवल्या होत्या. यासाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पालिकेकडे 494 हरकती-सूचना दाखल झाल्या होत्या. यावर तीन दिवसांत यावर सुनावणी घेण्यात आली. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इकबाल सिंह चहल यांच्याकडून ही सुनावणी घेण्यात आली. यानंतर ही अंतिम रचना आज 6 ऑक्टोबर रोजी राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे.
अशी होणार पुढील प्रक्रिया…
- राज्यातील 29 महापालिकांपैकी निश्चित केलेल्या 6 ऑक्टोबरच्या मुदतीनुसार फक्त आज दहा पालिकांची प्रभागरचना अंतिम झाली आहे.
- आता पुढील 2 ते 4 दिवसांत महापौरांचे आरक्षण सरकारकडून निश्चित केले जाईल. यानंतर उर्वरित पालिकांसाठी दिलेल्या 13
ऑक्टोबरच्या मुदतीनंतर मतदार याद्या आणि आरक्षणाची प्रक्रिया पार पडेल. - ही प्रक्रिया 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पार पडेल. यानंतर महिनाभरानंतर प्रत्यक्ष निवडणूक होईल.
सर्वाधिक हरकती वॉर्ड बदलाच्या
पालिकेच्या संकेतस्थळावर आणि सर्व वॉर्डमध्ये मतदारांनी आपला वॉर्ड बदलल्याच्या तक्रारी केल्या. शिवाय वॉर्डची सीमा बदलली, मतदान केंद्र बदलले अशा तक्रारी होत्या. त्यामुळे अंतिम 308 हरकती सूचनांवर सुनावणी घेऊन प्रभाग रचना अंतिम करण्यात आली. तर संदिग्ध आणि डबल सूचना फेटाळण्यात आल्या.
लोकसंख्येच्या आराखड्यानुसारच रचना
मुंबईमध्ये एका प्रभागासाठी किमान 54 हजार 812 लोकसंख्या असणे गरजेचे आहे. यामध्ये 10 टक्के जास्त आणि 10 टक्के कमी लोकसंख्येनुसार प्रभाग निश्चित करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. यानुसार जास्तीत जास्त 60 हजार 992 तर कमीत कमी 59 हजार 301 करता येतात. या सूत्रानुसार प्रभाग रचना निश्चित करण्यात आली.
Comments are closed.