जयपूर हॉस्पिटलमध्ये आग लागली, 8 रुग्ण मरतात
मध्यरात्रीच हाहाकार : आरोग्यमंत्र्यांसमोर नातेवाईकांची घोषणाबाजी अन् गोंधळ, पोलिसांशी झटापट
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानची राजधानी जयपूरमधील सवाई मानसिंग (एसएमएस) रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या आयसीयूमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर आग लागली. या घटनेत तीन महिलांसह आठ रुग्णांचा मृत्यू झाला. सरकारी रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयूमध्ये रविवारी रात्री लागलेल्या आगीच्या या घटनेचे चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. प्राथमिक तपासात ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तरीही या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी सरकारने सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
जयपूरमधील एसएमएस ट्रॉमा सेंटरमध्ये लागलेल्या आगीमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. राज्यातील विविध जिह्यांतील लोक त्यांच्या रुग्णांना बचावासाठी येथे आणत असले तरी अशा दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू आल्यामुळे अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आगीच्या घटनेवेळी ट्रॉमा सेंटरमध्ये 250 रुग्ण दाखल होते. यापैकी आयसीयूमध्ये दाखल झालेल्या 46 रुग्णांच्या जीवाला सर्वाधिक धोका होता.
एसएमएस मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॉमा अँड ऑर्थोपेडिक इन्स्टिट्यूटमध्ये एकूण 284 बेड आहेत. येथे चार आयसीयू कक्ष असून त्यात प्रत्येकी 46 बेड आहेत. आगीच्या दुर्घटनेवेळी सर्व 46 बेड रुग्णांनी भरलेले होते. आठ ऑपरेशन थिएटर असून तेथे दररोज 40 ते 50 ऑपरेशन होतात. तसेच सहा जनरल वॉर्ड असून तेथे कोणत्याही वेळी सरासरी 250 रुग्ण दिसून येतात.
मंत्रीमहोदय घटनास्थळी, नातेवाईकांचा रोष
आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मध्यरात्रीच रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा आणि गृहराज्यमंत्री जवाहर सिंग बेधम यांनी मृतांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. तसेच सकाळपासूनच अनेक नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली आहे. यादरम्यान एसएमएस हॉस्पिटलबाहेर दोन आरएलपी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सरकार आणि आरोग्यमंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रसंगी आंदोलक आणि नातेवाईकांची पोलिसांशी झटापटही झाली. दरम्यान, एसएमएस ट्रॉमा सेंटर दुर्घटनेतील बळींच्या कुटुंबियांशी बोलल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली.
Comments are closed.