दोन टप्प्यात बिहारमध्ये लढाई
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान घेण्याची घोषणा सोमवारी निवडणूक आयोगाने केली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पहिल्या टप्प्यात 6 नोव्हेंबर रोजी एकूण 121 जागांवर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 11 नोव्हेंबर रोजी 122 जागांवर मतदान होईल. दोन्ही टप्प्यातील मतमोजणी शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. पारदर्शक, सुरळीत आणि हिंसाचारमुक्त निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आयोगाने अनेक महत्त्वाच्या नवीन व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या उपस्थितीत सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी 40 दिवसांचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. बिहारमध्ये एकूण 7.42 कोटी मतदार आहेत, त्यापैकी अंदाजे 14 लाख जण पहिल्यांदाच मताधिकार बजावतील. राज्यात एकूण 3.92 कोटी पुरुष आणि 3.50 कोटी महिला मतदार आहेत. तसेच 14,000 मतदार 100 वर्षांहून अधिक वयाचे आहेत. या निवडणुकीसाठी राज्यात एकूण 90,712 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना 10 ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल. 17 ऑक्टोबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येईल. 18 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल. 20 ऑक्टोबरपर्यंत माघार घेता येईल. या टप्प्यासाठी मतदान गुरुवार, 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना 13 ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल. या टप्प्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येईल. 21 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी केली जाईल. या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर आहे. या टप्प्यासाठी मतदान मंगळवार, 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
बिहार निवडणुकीत सुरक्षेवर विशेष भर
बिहार विधानसभा निवडणूक मतदारांसाठी अतिशय सुरळीत आणि सोपी करण्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेवरही बारकाईने लक्ष ठेवले जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले. आयोगाने एजन्सींना कडक सूचना दिल्या असून निवडणुकीदरम्यान हिंसाचार सहन केला जाणार नाही आणि मतदारांना किंवा उमेदवारांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली जाऊ नये, असे बजावले आहे. नवीन प्रणाली अंतर्गत मतदार आपले मोबाईल फोन मतदान केंद्राबाहेर ठेवू शकतात. मतदान केल्यानंतर ते परत घेऊ शकतात.
पारदर्शकतेसाठी मोठे बदल
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि साधेपणा सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ईव्हीएमवरील उमेदवारांचे फोटो आता रंगीत असतील. तसेच अनुक्रमांकाचा आकार मोठा व ठसठशीत असेल. यामुळे मतदारांना त्यांची ओळख पटवणे सोपे होईल. राजकीय पक्षांच्या मागण्या आणि पारदर्शकतेनुसार आयोगाने ईव्हीएम मतमोजणीच्या शेवटच्या दोन फेऱ्यांपूर्वी पोस्टल मतपत्रिका मोजणे अनिवार्य असेल, अशी महत्त्वाची घोषणाही केलेली आहे.
एसआयआरवरही भाष्य
जवळजवळ 22 वर्षांनंतर बिहारमध्ये मतदार यादी फेरसर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी यादीत असंख्य विसंगती असल्याची मागणी केली होती. सोशल मीडियावर हे मोठ्या प्रमाणात अतिरंजित केले गेले. तथापि, 243 विधानसभा मतदारसंघांमधील 1.6 लाख बूथ-लेव्हल एजंट्सच्या सहकार्याने मतदारयाद्यांमध्ये पारदर्शक सुधारणा करण्यात आल्या, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रम (एकूण जागा : 243)
निवडणूक प्रक्रिया पहिला टप्पा (121) दुसरा टप्पा (122)
अधिसूचना 10 ऑक्टोबर 13 ऑक्टोबर
अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 20 ऑक्टोबर
नामांकन अर्जांची छाननी 18 ऑक्टोबर 21 ऑक्टोबर
अर्ज माघारीची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 23 ऑक्टोबर
निवडणूक मतदानाची तारीख 6 नोव्हेंबर 11 नोव्हेंबर
मतमोजणी/ निकाल 14 नोव्हेंबर 2025 (शुक्रवार)
बिहार विधानसभा निवडणूकविषयक आकडेवारी….
एकूण मतदान केंद्रांची संख्या 90,712
प्रति मतदान केंद्र सरासरी मतदार 818
शहरांमधील मतदान केंद्रांची संख्या 13,911
गावांमधील मतदान केंद्रांची संख्या 76,801
युवकांनी व्यवस्थापित केलेली केंद्रे 38
महिलांनी व्यवस्थापित केलेली केंद्रे 1,044
राज्यातील मॉडेल बूथची संख्या 1,350
विधानसभेतील जागा
एकूण सदस्यसंख्या 243
सामान्य जागा – 203
अनुसूचित जमातीच्या जागा – 02
अनुसूचित जातीच्या जागा – 38
राज्यातील मतदारांची स्थिती
एकूण मतदार – 7.42 कोटी
पुरुष मतदार – 3.92 कोटी
महिला मतदार – 3.50 कोटी
ट्रान्सजेंडर मतदार – 1,725
दिव्यांग मतदार – 7.2 लाख
85 वर्षांवरील मतदार – 4.04 लाख
20-29 वयोगटातील मतदार – 1.63 कोटी
नवमतदारांची संख्या – 14 लाख
वृद्ध मतदारांची संख्या – 4 लाख
100 वर्षे पूर्ण केलेले मतदार – 14 हजार
सेवेतील मतदारांची संख्या – 1.63 लाख
……….
Comments are closed.