सात राज्यांत पोटनिवडणुकीची घोषणा केली

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करत असतानाच, केंद्रीय निवडणूक आयोगाने सात राज्यांमधील आठ विधानसभा पोटनिवडणुकांचा कार्यक्रमही घोषित केला आहे. या सर्व आठ मतदारसंघांमध्ये 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तसेच मतगणना 14 नोव्हेंबरला केली जाणार आहे. काही ठिकाणी विद्यामान आमदाराने राजीनामा दिल्याने, तर काही ठिकाणी आमदारांचे निधन झाल्याने या पोटनिवडणुका होत आहेत. जम्मू-काश्मीर प्रदेशात दोन पोटनिवडणुका आहेत. तर इतर सहा राज्यांमध्ये प्रत्येकी एक पोटनिवडणूक होत आहे.

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात बडगाम आणि नागरोटा या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. विद्यमान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम मतदार संघ सोडून दिल्याने तेथे पोटनिवडणूक होत आहे. तर नागरोटा मतदारसंघातील विद्यामान आमदार दिवेंदरसिंग राणा यांचे निधन झाल्याने तेथे पोटनिवडणूक होत आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. राजस्थानमधील अंता, झारखंडमधील घाटसीला, तेलंगणामधील ज्युबिली हिल्स, पंजाबमधील तरणतारण, मिझोराममधील डांपा आणि ओडीशातील नुआपाडा या अन्य सहा राज्यांमधील विधानसभा मतदारसंघांमध्येही पोटानिवडणुका होत आहेत.

Comments are closed.