उद्घाटनाआधी विमानतळाच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई; सिडकोचा अतिक्रमण विभाग अॅक्टिव्ह मोडवर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर सिडकोचा अतिक्रमण विभाग अॅक्टिव्ह मोडवर आला आहे. या विभागाने परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत पनवेल परिसरातील दोन बेकायदा पार्किंग झोनवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने केलेल्या या कारवाईत तब्बल १७ हजार २०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. विशेष म्हणजे विमानतळ परिसरातील पायाभूत सुविधा, सुरक्षेची काळजी तसेच शिस्तबद्ध पार्किंगसाठी मोहीम राबविण्यात आल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. याअंतर्गत कळंबोली जंक्शन परिसरातील रस्त्यालगतची तात्पुरती वाहनतळे व अव्यवस्थित पार्किंग झोन हटवण्यात आले. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनधिकृत बांधकाम विभागाचे नियंत्रक लक्ष्मीकांत डावरे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवण्यात आली.

सिडकोकडून अवैध वाहनतळाचे भूखंड मोकळे
पनवेल सेक्टर १८ मधील सुमारे ४ हजार ७०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभारलेले बेकायदा पार्किंग आणि त्यातील वाहने हटविण्यात आली. याशिवाय सेक्टर ३ मध्ये १२ हजार २०० चौरस मीटर क्षेत्रफळ व्यापून तयार करण्यात आलेल्या बेकायदा वाहनतळावरही बुल डोझर फिरवण्यात आला. विमानतळासारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पाश्र्वभूमीवर वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने अशा पार्किंग झोनमुळे अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी ही कारवाई हाती घेण्यात आली असल्याचे सिडकोच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.