मोरा बंदरात पर्यटक ‘जाळ्यात’; रेलिंगवर अवजड जाळ्या टाकल्याने चालणेही कठीण

हवामान खात्याने पुन्हा वादळी वारे आणि पावसाचा इशारा दिल्याने मोरा बंदरात हजारो मच्छीमार बोटींनी आश्रय घेतला आहे. या बोटींवरील मच्छीमारांनी भल्यामोठ्या जाळ्या बंदराच्या वाटेवरील रेलिंगवरच टाकल्यामुळे पर्यटक, मच्छीमार, कामगार आणि ग्रामस्थांना चालणे कठीण झाले आहे. मोरा बंदरात तर पर्यटकच जणू ‘जाळ्यात’ अडकले असून त्यांच्या सोयीसुविधांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे.

मोरा प्रवासी जेट्टीवरून भाऊचा धक्का (मुंबई) अशी प्रवासी वाहतूक सुरू असते. त्याशिवाय याच जेट्टीवरून मोरा-घारापुरी सागरी मार्गावर पर्यटक व बाजारहाट करण्यासाठी गावकऱ्यांची ये-जादेखील असल्याने तेथे रोज गर्दी होते. शेकडो मच्छीमार बोटीदेखील या मोरा जेट्टीचाच अधिक वापर करतात. मात्र सध्या वादळी हवामानामुळे या मोरा जेट्टीच्या आश्रयाला मोठ्या प्रमाणावर मच्छीमार बोटी आल्या आहेत. त्यांनी मोरा जेट्टी आणि रेलिंगवरच अवजड जाळी टाकल्याने अडथळा निर्माण झाला आहे. मोरा जेट्टीवरून तर प्रवासी, मच्छीमारांना चालणेही अवघड होऊन बसले आहे.

मच्छीमारांना समज देऊनही दुर्लक्ष
वाढत्या मासेमारी बोटींवरील जाळींचा वाढलेला त्रास आता प्रवाशांनाही सोसावा लागत आहे. यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या या जेट्टीवर अडथळे निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेतली जाते. मात्र काही मच्छीमार जेट्टीवरच जाळी टाकून देतात. मच्छीमारांना अनेकदा समजदेखील देण्यात आली, पण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Comments are closed.