Foreign Accent Syndrome: असा दुर्मिळ आजार ज्यात बदलते रुग्णांची भाषा

प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी स्थानिक भाषा असते. स्थानिक भाषा म्हणजे विशिष्ट समुदाय किंवा प्रदेशात दैनंदिन संवादासाठी वापरली जाणारी मूळ भाषा किंवा बोली. जसे भारतात प्रत्येक राज्यांप्रमाणे हिंदी, तेलगू, मराठी, तामिळ, कन्नड अशा स्थानिक भाषा बोलल्या जातात. तसेच परदेशात फ्रेंच, जपानी, जर्मन अशा प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. पण एखादी भाषा ही न शिकता बोलता येत नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की एक असा आजार आहे, ज्याने ग्रस्त रुग्णांची भाषा अचानक बदलते. जगभरात असे अनेक आजार आहेत ज्याची लक्षणे फार विचित्र असतात. तसेच या आजाराचे योग्य निदान करणेही कठीण जाते. त्यापैकीच एक फॉरेन अ‍ॅक्सेंट सिंड्रोम हा आजार आहे.

फॉरेन अ‍ॅक्सेंट सिंड्रोम
फॉरेन अ‍ॅक्सेंट सिंड्रोम या आजाराला अ‍ॅक्सेंट चेंज सिंड्रोम असेही म्हंटले जाते. या आजाराने ग्रस्त रुग्ण अचानकच वेगळ्या अक्सेंटमध्ये भाषा बोलायला लागतात. तर कधी कधी अशीही परिस्थिती येते जेव्हा रुग्ण दुसरीच भाषा बोलायला लागतो जी त्याने कधीही शिकलेली नसेल.

खरं तर, वेगवेगळ्या देशांत उच्चार हे वेगळ्या पद्धतीने केले जातात. उदा,अमेरिकन लोकांचे इंग्लिश अक्सेंट वेगळे असते, तर भारतातील लोकांचे इंग्लिश अक्सेंट वेगळे असते. त्यामुळे या दोन्ही देशातील लोकांना एकमेकांचे उच्चार शिकायला खूप वेळ लागतो. पण फॉरेन अ‍ॅक्सेंट सिंड्रोमचे रुग्ण सहजच एखाद्या वेगळ्या अक्सेंटमध्ये बोलू लागतात.

हा एक दुर्मिळ सिंड्रोम असल्याचे म्हटले जाते. 1907 मध्ये या आजाराचे निदान झाले होते. अहवालांनुसार, मेंदूच्या डाव्या बाजूचा भाग असणाऱ्या ब्रोका या भागाला दुखापत झाल्यास ही स्थिती उद्भवते. मेंदूचा हाच भाग बोलण्यासाठी मदत करत असतो. त्यामुळे या भागाला नुकसान पोहोचल्यास आपल्या बोलण्यावर परिणाम होतो. ही एक अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे, उपचारासाठी रुग्णांना सहसा स्पीच थेरपी किंवा समुपदेशन दिले जाते.

Comments are closed.