राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं; सरकारच्या तुटपुंजी मदतीवरून कैलास पाटील यांची टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे. मात्र ही मदतीची घोषणा म्हणजे ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’, अशी असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे.
X वर पोस्ट करत कैलास पाटील म्हणाले आहेत की, “सरकारने हेक्टरी फक्त १८,५०० ते ३२,५०० रुपये नुकसानभरपाई जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. ही काही ठोस मदत नाही तर, शेतकऱ्यांचा अपमान आहे. सत्ताधारी म्हणत आहेत की आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज दिलंय, मग पंजाब सरकारप्रमाणे हेक्टरी ५०,००० रुपये मदत का नाही दिली? आज एक एकरी शेतीचा खर्च ३० ते ४० हजारापर्यंत जातो, मग १८,५०० ते ३२,५०० रुपयाच्या थोडक्या मदतीतून शेतकरी सावरणार कसा? हा दिलासा नाही, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक आहे.”
कैलास पाटील म्हणाले, “रब्बी आणि विम्याचं गाजर दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, कर्जमाफीच्या घोषणेसारखीच ही फसगत आहे. कर्जमाफीसाठी ही योग्य वेळ नव्हती का? कर्जमाफीसाठी आणखी किती नुकसान होण्याची गरज होती? कधी येणार योग्य वेळ जेव्हा शेवटचा शेतकरी फाशी लावून घेईल तेव्हा का? विद्यार्थ्यांच्या बाबतीतही तेच, परीक्षा शुल्क जास्त असतो की शैक्षणिक शुल्क हे ही राज्यकर्त्यांना माहीत नाही का? या शब्दांच्या खेळात मुलांचही भविष्य अडकवलंय. हे सरकार फक्त फसव्या घोषणांचं आणि आकड्यांचं गाजर दाखवत आहे.”
Comments are closed.