केंद्र अनेक रेल्वे प्रकल्पांना मंजूर करते
गाड्यांचा वेग वाढणार, सुरक्षा व्यवस्था चोख होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे विभागाशी संबंधित चार प्रकल्पांना संमती दिली आहे. त्यांच्यासाठी 24 हजार 634 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकल्पांच्या अंतर्गत अनेक चौपदरी रेल्वे मार्गांचे रुपांतर सहा पदरी मार्गांमध्ये केले जाणार आहे. या मार्गांची एकंदर लांबी 894 किलोमीटर आहे. हे मार्ग सहा पदरी झाल्याने सध्याच्या वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. तसेच गाड्यांचा वेग वाढविण्याच्या योजनेवरही काम केले जात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत या चार प्रकल्पांवर विचार करण्यात आला. हे प्रकल्प लाभदायक ठरणार असल्याने त्यांना संमती देण्यात आली. हे चार प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये साकारणार आहेत. हे प्रकल्प येत्या पाच ते सहा वर्षांमध्ये पूर्ण केले जाणार आहेत. या चार राज्यांमधील एकंदर 18 जिल्हे या प्रकल्पांच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत.
वैष्णव यांच्याकडून माहिती
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील वर्धा आणि भुसावळ यांना जोडणारा रेल्वेमार्ग आता चौपदरी केला जाणार आहे. सध्या तो दुपदरी आहे. हा प्रकल्प 314 किलोमीटर लांबीचा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गोंदिया ते छत्तीसगड राज्यातील डोंगरगढ हा 84 किलोमीटरचा रेल्वेमार्ग चौपदरी करण्यात येणार आहे. सध्या तो दुपदरी आहे. तिसरा प्रकल्प गुजरातमधील बडोदा ते मध्यप्रदेशातील रतलाम यांना जोडणारा दुपदरी रेल्वेमार्ग चौपदरी केला जाणार आहे. हा 259 किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे. चौथा प्रकल्प मध्यप्रदेशातील असून त्याच्या अंतर्गत इटारसी ते भोपाळ-बीना असा आहे. या मार्गाचेही चौपदरीकरण केले जाणार असून तो 237 किलोभीटर लांबीचा आहे, अशी माहिती देण्यात आली.
वर्दळीचे मार्ग
ज्या चार रेल्वे प्रकल्पांना संमती दिली गेली आहे, ते देशातील अत्यंत वर्दळीच्या मार्गांवर आहेत. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी या मार्गांचे चौपदरीकरण करणे अनिवार्य बनले आहे. रतलाम ते बडोदा हा मार्ग दिल्ली ते मुंबई कॉरीडॉरचा भाग आहे. त्यामुळे त्याचे चौपदरीकरण महत्वाचे आहे. देशातील 41 टक्के रेल्वे मालवाहतूक आणि 41 टक्के प्रवासी वाहतूक या मार्गांवरुन चालते. तसेच वर्धा ते भुसावळ हा मार्ग मुंबई ते हावडा मार्गावरच आहे. या मार्गांचे चौपदरीकरण व्हावे, अशी मागणी बऱ्याच काळापासून केली जात होती. ती आता पूर्ण झाली आहे. देशात रेल्वे जाळे भक्कम करणे आणि गाड्यांचा वेग तसेच सुरक्षा वाढविणे, ही दोन उद्दिष्ट्यो केंद्र सरकारने आपल्यासमोर ठेवली आहेत. वाहतून वेगाने करणे हे ध्येय आहे, अशीही माहिती वैष्णव यांनी यावेळी पत्रकारांना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने हे प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते वेळेच्या आधीच पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असेल, असे स्पष्ट करण्यात आले.
Comments are closed.