गौतम गंभीर यांनी संघात रुजवली विजयी वृत्ती, वरुण चक्रवर्तीने हेड कोच बद्दल केला मोठा खुलासा
स्पिन गोलंदाज वरुण चक्रवर्ती म्हणाला आहे की भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघात अशी मानसिकता रुजवली आहे, ज्यात पराभव आणि सरासरी कामगिरीला अजिबात स्थान नाही. कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघात गंभीरसोबत काम केलेल्या चक्रवर्तीने मंगळवारी सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळ्याच्या वेळी पत्रकारांशी संवाद साधला.
तो म्हणाला, “मी त्यांच्यासोबत आयपीएलमध्ये काम केलं आहे आणि आम्ही 2024 मध्ये विजेते ठरलो होतो. माझ्यासाठी हे काही नवीन नाही, कारण मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आधीच खेळलो आहे.”
चक्रवर्ती पुढे म्हणाला, “गंभीर संघाला अशा पद्धतीने तयार करतात की पराभव हा पर्यायच नसतो. तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ दाखवायचा असतो आणि मैदानावर सर्व काही झोकून द्यायचं असतं. त्यानंतर जे होईल ते स्वीकारायचं. त्यांच्या उपस्थितीत सरासरी कामगिरी चालत नाही, हे माझं मत आहे.”
‘मिस्ट्री स्पिनर’ या टॅगबद्दल बोलताना चक्रवर्ती म्हणाला, “मी कधी स्वतःला रहस्यमय गोलंदाज म्हटलं नाही. हे नाव मीडियाने दिलं आहे. पण जर लोक मला तसे म्हणू इच्छित असतील, तर मला काही हरकत नाही. माझ्या प्रत्येक चेंडूची पकड आणि रिलीज पॉइंट सारखा असतो, त्यामुळे फलंदाजांना ओळखणं कठीण जातं.”
विवादित आशिया कप 2025 बद्दल विचारल्यावर तो म्हणाला, “संघाचं लक्ष फक्त अपराजित राहण्यावर होतं. आम्ही बाहेरील आवाजांकडे लक्ष दिलं नाही. आम्ही सामने जिंकण्यासाठीच मैदानात उतरलो होतो.”
भारताने आशिया कप जिंकल्यानंतरही ट्रॉफी आणि पदकांशिवाय परत यावं लागलं. त्याबद्दल चक्रवर्ती म्हणाला, “आम्ही प्रत्येक सामन्यापूर्वी रणनीती आखत होतो. फाइनलपूर्वी दोनदा पाकिस्तानविरुद्ध खेळलो होतो, त्यामुळे काय करायचं हे आम्हाला ठाऊक होतं. आम्ही अपराजित राहत आशिया कप जिंकण्यासाठीच गेलो होतो.”
शेवटी तो म्हणाला, “आम्ही सर्वांनी आपले सोशल मीडिया अकाउंट बंद केले होते. फक्त सामन्यानंतर काही पोस्ट करण्यासाठीच वापरत होतो. भारतात काय वातावरण होतं हे माहीत नाही, पण यूएईत मात्र पूर्ण शांतता होती.”
Comments are closed.