आर्मी होम स्टेटमध्ये निसर्गरम्य उत्तराखंड

पर्यटनासोबत सीमाही होणार सुरक्षित : चीन अन् नेपाळ सीमेनजीकच्या गावात निर्मिती

वृत्तसंस्था/ देहरादून

भारतीय सैन्याने उत्तराखंडच्या कुमांऊ भागातील सीमावर्ती गाव गरब्यांगमध्ये टेंट आधारित होम स्टे निर्माण केले आहेत. हे गाव चीन आणि नेपाळ या दोन्ही देशांच्या सीमेपासून नजीक आहे. येथूनच कैलास पर्वत, लिपुलेख खिंड, ओम पर्वत, आदि कैलास, कालापानीचा मार्ग जातो. सैन्याने हे होमस्टे ग्रामस्थांना सोपविले असून गरब्यांग ग्राम समिती याच्या बुकिंगची जबाबदारी सांभाळणार आहे.

हे होम स्टे केवळ पर्यटनाला चालना देण्यासाठी नव्हे तर सीमेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही महत्त्वपूर्ण आहेत. कैलास मानसरोवरला जाण्यापासून ओम पर्वत आणि आदि कैलासला जाण्यासाठी याच गावातून मार्ग जातो. तसेच या मार्गांवर आणखी अनेक गावं असून तेथील लोकांची उपजीविका पर्यटकांवरच अवलंबून आहे. पर्यटनाला चालना मिळाल्याने ही गावं पुन्हा लोकांनी भरणार आहेत. या गावांमध्ये मूलभूत सुविधा आणि रोजगाराचा अभाव असल्याने लोकांचे पलायन होत असते. या गावांमधील लोकांची वस्ती वाढविण्यासाठी राज्य सरकार देखील पावले उचलत आहे.

सीमावर्ती भागात स्थानिक लोकांची उपस्थिती सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. स्थानिक लोक गरजेच्या प्रसंगी सैनिकांपर्यंत मदत पोहोचवितात तसेच सैन्याला आवश्यक माहितीही पुरवित असतात. गरब्यांग गावात होम स्टे निर्माण होणे आणि पर्यटनाला चालना मिळणे हे गाव चीन आणि नेपाळ सीमेनजीक असल्याने महत्त्वपूर्ण आहे. येथील होमस्टेचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल डी.जी. मिश्रा यांनी केले आहे.

पर्यटकांना सुविधा

या भागात होम स्टे निर्माण झाल्याने स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे तसेच येथे पोहोचणऱ्या पर्यटकांनाही सुविधा उपलब्ध होईल. दिल्ली-एनसीआर समवेत देशाच्या अन्य भागांमधून साहसी पर्यटनात रुची बाळगणारे लोक ओम पर्वत आणि आदि कैलासला जातात. गरब्यांग गावाला शिवनगरी गुंजीचे प्रवेशद्वार मानले जाते. हिमालयातील सुंदर खोरे आणि हिमाच्छादित शिखरांदरम्यान वसलेले हे गाव आहे. पर्यटकांना येथे या होम स्टेमध्ये कमी किमतीत स्थानिक जीवनशैलीचा अनोखा अनुभव मिळू शकणार आहे. होम स्टेचे भाडे प्रतिव्यक्ती 1000 रुपये प्रति रात्र ठेवण्याचा आणि यात भोजनही सामील करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

-कुमांऊ भागात सीमावर्ती गाव गरब्यांगमध्ये होम स्टेची निर्मिती

-सैन्याने होम स्टेची निर्मिती करत ते ग्रामस्थांना सोपविले

-पर्यटन वाढल्यास सीमावर्ती गावांमध्ये परतणार लोक

-सीमेच्या सुरक्षेसाठी स्थानिक लोकांची उपस्थिती महत्त्वपूर्ण

Comments are closed.