Mumbai News – इमारतीवरून वीट डोक्यात पडली आणि संस्कृतीच्या स्वप्नांचा चुराडा झाला; लेकीचा मृत्यू अन् वडिलांचा टाहो

लाखो तरुणांच्या स्वप्नांना दिशा दाखवणारं शहर म्हणून मुंबईचा नावलौकिक आहे. परंतु याच मुंबई शहरात स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या आणि आपल्या कुटुंबाला आधार देऊ पाहणाऱ्या 22 वर्षीय संस्कृतीचा निर्माणाधीन इमारतीवरून सिमेंटची वीट डोक्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जोगेश्वरी पूर्व परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संस्कृतीच्या स्वप्नांचा चुराडा झाला. या घटनेमुळे कुटुंब हादरून गेलं आहे, तर लेकीच्या मृत्यूने बापाने टाहो फोडला आहे.
जोगेश्वरी पूर्व येथील मजासवाडी परिसरात आज (08 ऑक्टोबर 2025) सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृत तरुणीचे वडिल अनिल उमेश अमिन (56) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संस्कृतीने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला असून गेल्या काही दिवसांपासून ती गोरेगाव पश्चिम येथील RBL बँकेत कामाला जात होती. आजही ती सकाळी नेहमीप्रमाणे 9.30 वाजता कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. ती बाहेर पडली आणि काही क्षणात बाहेरून जोरात आराडाओरड सुरू झाली. आवाजामुळे बाहेर जाऊन पाहिलं असता संस्कृती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या डोक्यात निर्माणाधीन इमारतीमधून सिमेंटची वीट पडली. डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमामात रक्त्रस्त्राव झाला होता. तिला तात्काळ जवळील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृत तरुणीचे शवविच्छेदन करण्यासाठी पार्थिव रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
Comments are closed.