पंतप्रधान आले आणि शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले, सरकारच्या तुटपुंजी मदतीवरून हर्षवर्धन सपकाळ यांचे टिकास्त्र

“राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येणार आहेत, या पार्श्वभूमीवर फसवणीस सरकारचे फसवणीस पॅकेज हे काल देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. त्यावर कळस म्हणजे आज देशाचे पंतप्रधान आले आणि शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले”, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “महाराष्ट्र इतकी मोठी नैसर्गिक आपत्ती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक चकार देखील काढला नाही. शेतकऱ्यांच्या मदतीचा आणि कर्जमाफीचा कोणताही उल्लेख त्यांनी केला नाही. वास्तविक पाहता नरेंद्र मोदी यांची आजची भेट खासगी होती. ही सरकारी भेट नव्हती.”

ते म्हणाले, “नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळच्या माणसाला सगळी मुंबई आंदण देण्याचे एक कारस्थान मागच्या काळापासून राबवलं गेलं आहे. त्यांना धारावी दिली, जुनं विमानतळ दिलं, गोरेगाव येथील आरेची जमीन दिली. एमएमआरडीएची जमीन दिली. सोबतच नवी मुंबईत जवळपास 2000 हेक्टरपेक्षा अधिक भाग नवीन मुंबईच्या विमानतळाच्या अनुषंगाने दिला गेला. हा सर्व एकाच माणसाला (गौतम अदानी) दिला गेला. इतक्या मोठ्या मुंबईचा मालक मला माझा माणूस करायचा आहे आणि त्यातलेच एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून आज नरेंद्र मोदी हे उद्घाटानला आले.”

Comments are closed.