सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात निकालाला आव्हान देणार नाही, सीबीआयची हायकोर्टात माहिती

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी मुंबई विशेष सीबीआय न्यायालयाने भाजप अध्यक्ष अमित शहांसह इतर आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. सत्र न्यायालयाचा हा निकाल सीबीआयने स्वीकारला असून विशेष न्यायालयाच्या निकालाला कोणतेही आव्हान देण्यात येणार नाही, अशी माहिती सीबीआयने हायकोर्टात दिली.

गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी गुजरातमधील आयपीएस अधिकारी राजकुमार पांडियन यांच्यासह डी. जी. वंझारा, एम. एन. दिनेश आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र यातील काही अधिकाऱ्यांची या खटल्यातून निर्दोष सुटका करण्यात आली. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने हायकोर्टात आव्हान दिले असून आज बुधवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी खंडपीठाला सांगितले की, तपास यंत्रणा विशेष न्यायालयाच्या निकालाविरुद्ध कोणतेही अपील दाखल करणार नाही. सीबीआयने निर्दोष सुटण्याचा निर्णय स्वीकारला आहे, असे खंडपीठाला सांगितले.

साक्षीदारांची यादी सादर करा

अपीलकर्त्यांनी खटला सदोष असल्याचा दावा केला. त्यांनी आरोप केला की, काही साक्षीदारांनी असा दावा केला होता की त्यांच्या साक्षी ट्रायल कोर्टाने अचूकपणे नोंदवल्या नाहीत. त्यावर खंडपीठाने याचिकाकर्त्यांना ज्या साक्षीदारांचे जबाब त्यांच्या दाव्यानुसार अचूकपणे नोंदवले गेले नाहीत त्यांची यादी सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी 15 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.

Comments are closed.