अमेरिकेकडून पाकिस्तानला घातक क्षेपणास्त्र!

टॅरिफ, एच1बी व्हिसा आणि व्यापार कराराच्या मुद्दय़ांवरून हिंदुस्थानची कोंडी करणाऱ्या अमेरिकेने आता आणखी एक धक्का दिला आहे. अमेरिका पाकिस्तानला एम-120 ही घातक क्षेपणास्त्रे पुरवणार आहे. अमेरिकेच्या युद्ध विभागाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून आज ही माहिती दिली.

डोनाल्ड ट्रम्प दुसऱयांदा सत्तेत आल्यापासून अमेरिकेचे परराष्ट्र धोरण कमालीचे बदलले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्याचे श्रेय पाकने ट्रम्प यांना दिले होते. तसेच त्यांच्या नावाची शिफारस नोबेल पुरस्कारासाठी केली होती. त्यामुळे अमेरिका व पाकिस्तानची जवळीक वाढली आहे. पाकिस्तानने अलीकडेच अमेरिकेशी शस्त्रास्त्र करारही केला आहे. याच कराराअंतर्गत पाकिस्तानला हवेतून हवेत मारा करणारी मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे मिळणार आहेत. मात्र, नेमकी किती क्षेपणास्त्रे पाकिस्तानला दिली जातील हे अमेरिकेने जाहीर केलेले नाही.

हिंदुस्थानच्या स्पॅल्प आणि हॅमरला टक्कर?

हिंदुस्थानकडे सध्या असलेल्या स्पॅल्प आणि हॅमर क्षेपणास्त्रांना तोड म्हणून पाकिस्तान ही क्षेपणास्त्रे खरेदी करत असल्याचे सांगितले जाते. हिंदुस्थानचे स्पॅल्प हे ‘स्टॉर्म शॅडो’ म्हणून ओळखले जाणारे हवेतून मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. इंग्लंड, फ्रान्स, इटाली, इजिप्तसारखे देशही हे क्षेपणास्त्र वापरतात.

Comments are closed.