काॅण्ट्रक्टरसाठीच भाजप ‘बेस्ट’ संपवतेय! आदित्य ठाकरे यांचा हल्ला

खासगी काॅण्ट्रक्टरला प्रोत्साहन देऊन बेस्ट वाहतूक व्यवस्था संपवण्याचा घाट भाजप सरकारने घातल्याचा हल्ला आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. यासाठी ‘बेस्ट’ला निधी देण्याऐवजी आणि नव्या बसेस ताफ्यात घेण्याऐवजी गाड्यांचा ताफा कमी केला जात असल्याचेही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरून भाजप सरकारच्या ‘बेस्ट’विरोधी धोरणाची पोलखोल केली. भाजप सरकारच्या काळातच बसताफा कमी करून भाडेवाढ मात्र दुप्पट केल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारा प्रवास मुंबईकरांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईकरांचे हाल होत असताना भाजपच्या आशीर्वादामुळे खासगी कंत्राटदार मात्र नफा कमवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबई मेट्रो-3ने मार्गावरील रस्ते आणि पदपथांचे काम तातडीने पूर्ण करायला हवे. मात्र शेवटच्या टप्प्यासाठी पुन्हा वाहनाची गरज भासतेय हे अत्यंत लाजिरवाणे असल्याचा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला. शेवटचा टप्पा चालण्यास योग्य असायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे.
दहा हजार इलेक्ट्रिक बस रखडल्या
महाविकास आघाडीच्या काळात बेस्टचे भाडे स्थिर आणि सर्वसामान्यांना परवडणारे ठेवण्यात आले होते. तसेच 2027 पर्यंत दहा हजार इलेक्ट्रिक बस ताफ्यात आणण्याची आमची योजना होती. मात्र भाजपने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना मुंबईची खरी लाइफलाइन संपवायची आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
Comments are closed.