आरेतील आदिवासी पाड्यांचा विकास करा, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली आदिवासी विकास मंत्र्यांची भेट

जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील आरे वसाहतीत पिढय़ान्पिढय़ा राहणाऱ्या आदिवासी बांधवांना त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत आणि आदिवासी पाडय़ांचा विकास करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेने आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेतली.

जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील गोरेगाव पूर्व येथील आरे दुग्ध वसाहतीतील प्रभाग क्र. 52 आणि 53 हा बहुतांशी भाग आदिवासीबहुल आहे. गेल्या अनेक दशकांपासून येथील आदिवासी बांधवांचे मूलभूत सुविधांशी निगडित प्रश्न प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे स्थानिक आमदार अनंत (बाळा) नर यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके यांची भेट घेतली. आदिवासी बांधवांचे मागील अनेक दशकापासून येथे वास्तव्य असून ते कसत असलेल्या जमिनी त्यांना महाराष्ट्र राज्य वन हक्क कायद्यान्वये त्यांचे हक्क अबाधित राहावे, पालिका विकास आराखडा 2034 मध्ये आदिवासी पाडय़ांचे सीमांकन करून समावेश करावा, आरे वसाहतीमधील आदिवासी बांधव कसत असलेल्या जमिनीबाबत सरकारने दिलेल्या नोटीस आणि जागेवरील मोजमाप यामध्ये असलेली क्षेत्रफळातील तफावत कमी न करता पुनर्तपासणी करावी, अशा विविध मागण्या यावेळी अनंत नर यांनी केल्या.

आदिवासींसाठी घरकुल योजना राबवा

आरे वसाहतीमधील आदिवासी बांधवांकरिता घरकुल योजना राबवावी, आदिवासी पाडय़ांना मूलभूत सुविधा पुरवा, मरोशी पाडा येथे रस्ता विकसित करा, जीतोनीचा पाडा व इतर पाडय़ांमध्ये पाणी व वीज या सुविधा पुरवा, 27 आदिवासी पाडय़ांच्या विकासाकरिता प्रत्येकी पाच कोटींचा निधी द्या, नवश्याचा पाडा येथील मोडकळीस आलेल्या समाज मंदिराच्या बांधकामासाठी तत्काळ वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र द्या, अशा मागण्यादेखील यावेळी करण्यात आल्या.

Comments are closed.