खोकला औषधाचा मृत्यू टोल 20 पर्यंत वाढतो

कोल्ड्रीफ सायरपवर अनेक राज्यांनी घातली बंदी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

खोकल्यावरचे विशिष्ट औषध घेतल्याने दगावलेल्या बालकांची संख्या मध्यप्रदेशात आता 20 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये आणखी चार बालकांचा  मृत्यू झाल्याने या सर्व प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एका सरकारी डॉक्टरला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या डॉक्टरने हे औषध घेण्याचा सल्ला रुग्णांना दिला होता. तथापि, हे औषध तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई कधी होणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.

मध्यप्रदेश प्रमाणे राजस्थानातही काही बालकांचा मृत्यू या सायरपमुळे झाल्याचे दिसून आले आहे. या मृत्यूंना जबाबदार असणाऱ्या ‘कोल्ड्रिफ’ या सायरपवर बंदी घालण्याची सूचना केंद्र सरकारने केली होती. त्यानुसार अनेक राज्यांनी या औषधावर आता बंदी घातली आहे. मात्र, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन हे औषध बनविणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

प्रवीण सोनी यास अटक

मध्यप्रदेशातला सरकारी डॉक्टर प्रवीण सोनी याला राज्य पोलिसांनी अटक केली आहे. तथापि, भारतीय वैद्यकीय संघटनेने त्याच्या अटकेला विरोध केला आहे. या प्रकरणात डॉक्टरचा फारसा दोष नाही. ज्या औषधाला सरकारने मान्यता दिली आहे, तेच औषध घेण्याचा सल्ला या डॉक्टरने दिला होता. त्याला अटक करुन काही उपयोग होणार नाही. औषधाच्या निर्मात्यांवर करवाई व्हावयास हवी, अशी स्पष्टोक्ती भारतीय वैद्यकीय संघटनेने बुधवारी सकाळी केली आहे.

अद्यापही विक्री

खोकल्यावरच्या काही सायरप्सवर बंदी घालण्यात आली आहे. चार वर्षेवयापेक्षा कमी मुलांना ती देण्यात येऊ नयेत, असा आदेश काढण्यात आला असला, तरी आजही या औषधांची विक्री केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारे यासंदर्भात गंभीर आहेत की नाहीत, अशा प्रश्न विचारला जात आहे. मध्यप्रदेश सरकारने सर्व संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिलेले आहे. छिंदवाडा येथील एका सरकारी औषध नियंत्रकाला निलंबित करण्यात आलेले आहे.

19 नमुने घेतले

ज्या बालकांनी हे औषध घेतले आहे, त्यांच्या पालकांकडून या औषधांचे 19 नमुने सरकारने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्यापैकी 10 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. मात्र, 9 नमुन्यांच्या चाचण्यांमध्ये कोणताही दोष आढळून आलेला नाही. एक नमुना मात्र दोषयुक्त निघाला आहे. असे असेल तर इतक्या बालकांचा मृत्यू का आणि कसा झाला, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या मृत्यूमागे अन्य काही कारण आहे काय, अशी शंकाही घेण्यात येत आहे.

मृत्यू कसे झाले…

औषधाची चव वाढावी म्हणून त्यात काही रासायनिक पदार्थ मिसळले गेले आहेत. या पदार्थांमुळे बालकांची मूत्रपिंडे निकामी झाल्याचे दिसून आले. यामुळे बालकांचा मृत्यू ओढवला. आता केंद्रीय आरोग्य विभागाने या नमुन्यांची ‘रिस्क बेस्ड’ चाचणी करण्याचा निर्णय घेतला असून तो अहवाल लवकरच येणार आहे.

अनेक राज्यांकडून बंदी

कफ सायरपमुळे मृत्यू मध्यप्रदेश आणि राजस्थानात ओढवले असले, तरी अनेक राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आधीच अशा औषधांवर बंदी घातली आहे. उत्तर प्रदेश. कर्नाटक, महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांनी कोल्ड्रिफ या औषधावर बंदी घातली आहे. या औषधाची निर्मिती तामिळनाडू या राज्यात केली जाते.  स्रेसन फार्मास्युटिकल्स असे या कंपनीचे नाव आहे. तिची चौकशी केली जात आहे.

पिडितांमध्ये संतापाची भावना

ड मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या नातेवाईकांचा संताप, कारवाईची मागणी

ड बंदी घातलेल्या औषधांची आजही विक्री होत असल्याचे होत आहे स्पष्ट

ड औषध निर्माण करणाऱ्या तामिळनाडूतील कंपनीविरोधात कारवाईची मागणी

Comments are closed.